यंदाच्या वायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेमध्ये पाकिस्तानील व्यावसायिकांची शिष्टमंडळे सहभागी होणार आहेत. २०१३ नंतर प्रथमच पाकिस्तानातील व्यावसायिकांचे शिष्टमंडळ या परिषदेमध्ये दिसणार आहे. १८ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान गुजरातमध्ये ही परिषद होणार आहे. जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांना गुजरातकडे आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना वायब्रंट गुजरातची संकल्पना मांडली होती.

पाकिस्तानच्या वेगवेगळया भागातून व्यावसायिकांची सात शिष्टमंडळे या परिषदेमध्ये सहभागी होऊ शकतात असे इंडियन एक्सप्रेसने म्हटले आहे. इतक्या मोठया संख्येने पाकिस्तानी उद्योगपती वायब्रंट गुजरात परिषदेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. विविध देशांच्या वाणिज्य आणि व्यापारी मंडळांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ५२ शिष्टमंडळांनी आंतरराष्ट्रीय चेंबरच्या जागतिक परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याचे कळवले आहे. वायब्रंट गुजरात परिषदेतील हा एक कार्यक्रम आहे.

२०१३ साली कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे २२ सदस्यांचे शिष्टमंडळ वायब्रंट गुजरात परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानातून आले होते. मुख्य परिषदेच्या आधी नऊ आणि १० जानेवारीला एक कार्यक्रम झाला त्यामध्ये हे शिष्टमंडळ सहभागी झाले होते. पण त्यानंतर सीमेवर जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीच्या उल्लंघनात दोन भारतीय जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही बाजूला तणाव वाढला. त्यामुळे मुख्य परिषदेआधीच हे शिष्टमंडळ पाकिस्तानात निघून गेले.

पाकिस्तानी शिष्टमंडळाच्या माघारी परतण्यासाठी त्यावेळी राज्य सरकारने व्हिसाचे कारण दिले. अनेक सदस्यांकडे फक्त अहमदाबादपर्यंतचाच व्हिसा होता. मुख्य कार्यक्रम गांधीनगरमध्ये होता असे कारण त्यावेळी राज्य सरकारकडून देण्यात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

गुजरात औद्योगिक विकास परिषदेच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. थारा यांच्याशी संपर्क साधला त्या म्हणाल्या की, पाकिस्तानातील व्यापारी चेंबरच्या प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांना सविस्तर माहिती विचारली असता त्या म्हणाल्या की, अनेक चेंबर्स पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. सर्व शिष्टमंडळांना स्वत:बद्दल आणि जागतिक व्यापाराबद्दल विचार मांडण्यासाठी २० मिनिटांची वेळ देण्यात येईल. दुसऱ्या देशाच्या चेंबर, कंपनी आणि सरकारी यंत्रणांबरोबर करार करण्यासाठीही त्यांना वेळ देण्यात येईल. पाकिस्तानशिवाय चीन, नेपाळ, भूतान आणि श्रीलंकेचे शिष्टमंडळही वायब्रंट गुजरातमध्ये सहभागी होणार आहे.