लाहोर उच्च न्यायालयात वकिलाची याचिका

भारताकडे असलेला पाच हजार वर्षांपूर्वीचा डान्सिंग गर्ल हा पुतळा परत मिळवावा, असे आवाहन पाकिस्तानातील एका वकिलाने याचिकेतून केले आहे. बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी लाहोर उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत या मागणीवर कृती करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या पुतळय़ाची उंची १०.५ सेंटिमीटर असून, तो ख्रि.पू. २५०० मधील आहे. हा पुतळा सिंधू संस्कृतीमधील मोहेंजोदारो शहरात १९२६ मध्ये सापडला होता. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार याचिकाकर्त्यांने तो पुतळा ही लाहोर म्युझियमची मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. हा पुतळा साठ वर्षांपूर्वी दिल्लीच्या राष्ट्रीय कला मंडळाच्या विनंतीनुसार भारतात नेण्यात आला व परत पाकिस्तानात आणला गेला नाही. पाकिस्तान नॅशनल म्युझियम ऑफ आर्ट्सचे महासंचालक जमाल शहा यांनी सांगितले, की संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या संस्थेला हा पुतळा परत आणण्याबाबत कळवण्यात आले आहे. वारसा जतनासाठी हा पुतळा परत आणणे महत्त्वाचे आहे. या पुतळय़ाला लिओनाडरे द विंची यांच्या मोनालिसा या चित्रासारखेच महत्त्व आहे. तो पाकिस्तानचा वारसा आहे. जगातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी तो पुतळा मौल्यवान असल्याचे म्हटले असून, सिंधू संस्कृतीचे प्रतीक असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.