पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद पसरवण्याचा कट पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ने रचल्याचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप पाकिस्तानने गुरुवारी फेटाळला असून उभय देशांतील संबंध सुरळीत करण्याच्या प्रयत्नांत अशी विधाने खोडा घालत असल्याचेही नमूद केले आहे.
देशांतर्गत सुरक्षेबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत शिंदे यांनी बुधवारी हा आरोप केला होता. शीख दहशतवादासंबंधात नव्याने काही गोष्टी घडत आहेत. पंजाबसह भारताच्या विविध भागांत घातपात घडविण्यासाठी आयएसआय पाकिस्तानातील दहशतवादी म्होरक्यांवर दडपण आणत आहे. शीख तरुणांना आयएसआय घातपाती कारवायांचे प्रशिक्षण देत असून अमेरिका व युरोपातील शीखांना भारताविरोधात चिथावत आहे, असे शिंदे म्हणाले होते.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ऐजाज़ अहमद चौधरी यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, असे आरोप करताना त्याला पुष्टी देणारे पुरावेही भारताने मांडले पाहिजेत. पाकिस्तानात नुकतेच सत्तांतर झाले असून नव्या सरकारने भारताबरोबर संबंध सुरळीत करण्यास अग्रक्रम दिला आहे. अशा वेळी शिंदे यांनी केलेली ही विधाने अकालीच आहेत, असेही चौधरी म्हणाले.