काश्मीर मुद्या आंतरराष्ट्रीयस्तरावर नेल्यानंतर पाकिस्तानने आता पुन्हा कुरापती करण्यास सुरूवात केली असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानकडून आता स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी)च्या १०० कमांडोंना एलओसीजवळ पाठवण्यात आले आहे. यावरून पाकिस्तान काहीतरी भारतविरोधी कृती करण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर भारतीय सैन्याचे  हालचालींवर बारकाईने बारकाईने लक्ष आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या कोणत्याही कारवाईस सडतोड उत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज असल्याचे सांगण्यात आलेले आहे. पाकिस्तानी तैनात केलेले हे कमांडो जैश -ए- मोहम्मद व अन्य दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

पाकिस्तानकडून एलओसीवर सैन्य वाढीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर भारतीय चौक्या देखील सतर्क झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जवानांनी अशातच केरन आणि माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या ‘बॉर्डर अॅक्शन टीम’ कडून करण्यात आलेल्या कारवाईचा प्रयत्न उधळून लावला होता.

पाकिस्तानकडून गुजरातच्या सीमेलगत असलेल्या इक्बाल-बाजवा या पोस्टवर एसएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान या कमांडोंचा वापर या ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय जवानांवर हल्ला करण्यासाठी करण्याची शक्यता आहे. तसेच, हे एसएसजी कमांडो भारतीय जवानांविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानच्या ‘बॉर्डर अॅक्शन टीम’ ला देखील मदत करणार असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.