मुंबईवरील २००८ च्या  हल्ल्याचा सूत्रधार झाकी उर रहमान लख्वी याला आणखी ३० दिवस सार्वजनिक सुरक्षा आदेशानुसार तुरुंगात ठेवण्यात यावे, असा आदेश पंजाब सरकारच्या गृह मंत्रालयाने दिल्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. लख्वीच्या सुटकेवर भारताने जोरदार निषेध नोंदवला होता, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पाकिस्तानातील पंजाब सरकारच्या गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की सार्वजनिक शांतता आदेशानुसार लख्वी याला आदियाला तुरुंगात ठेवण्यात येणार आहे, या आधी त्याला याच तुरुंगात ठेवले आहे.
लख्वीचे वकील रझा रिझवान अब्बासी यांनी असा दावा केला, की  पंजाब सरकारने या आदेशाची अंमलबजावणी करून पाकिस्तानच्या राज्यघटनेचे उल्लंघन केले आहे. आम्ही या बेकायदा आदेशाला उच्च न्यायालयात सोमवारी आव्हान देणार आहोत. पंजाब सरकारने लख्वीला परत तुरुंगात पाठवून न्यायालयाची बेअदबी केली आहे असा आरोप त्यांनी केला. आम्ही त्याची प्रत पंजाब सरकारने हस्तक्षेप करण्याआधीच दाखल करणार होतो पण त्याआधीच त्याला पुन्हा अटक करण्यात आली, असे अब्बासी यांनी सांगितले.