मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने सुटका केल्यानंतरही लख्वीचा तुरूंगातील मुक्काम आणखी ३० दिवसांना वाढला आहे. सार्वजनिक सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानने लख्वीची तात्काळ सुटका करण्यास नकार दिला. लख्वीला ताब्यात ठेवणे बेकायदेशीर आहे, असे सांगत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्याला तातडीने सोडण्याचे आदेश पाकिस्तान सरकारला दिले होते. मात्र, पंजाब सरकारतर्फे शनिवारी सार्वजनिक सुरक्षेच्या कारणासाठी लख्वीला आणखी ३० दिवस तुरूंगातच ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे लख्वीचा मुक्काम अदिआला कारागृहातच राहणार आहे.
दरम्यान, लख्वी याची पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने सुटका केल्याबद्दल भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना बोलावून तीव्र निषेध नोंदवला, तसेच आपली अस्वस्थता व चिंता व्यक्त केली होती. लख्वी तुरुंगाबाहेर येऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे, अशी समजही यावेळी त्यांना देण्यात आली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे सध्या पंतप्रधानांसोबत दौऱ्यावर असल्यामुळे प्रभारी परराष्ट्र सचिव अनिल वाधवा यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात बोलावले आणि न्यायालयाच्या आदेशाबाबत भारताची तीव्र नापसंती कळवली होती. पाकिस्तानच्या भारतीय उच्चायुक्तालयामार्फत हे प्रकरण तेथेही ‘वरच्या पातळीवर’ उपस्थित करण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.