अर्थमंत्री इशाक दार यांचे स्पष्टीकरण; राजकीय पक्षांना सहभागाचे आवाहन

परदेशी ऋण वाढण्याची भीती कायम असली आणि कितीही आर्थिक विवंचना समोर आल्या तरी पाकिस्तान आपल्या अणुकार्यक्रमापासून तसूभरही मागे हटणार नाही, असे पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत पार्लमेंटच्या वरिष्ठ सभागृहात सिनेटला माहिती देताना अर्थमंत्री इशाक दार यांनी वरील बाब स्पष्ट केली. हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी तो सुरू करण्यात आलेला नाही, हा आपल्या सुरक्षेचा कार्यक्रम आहे आणि त्याचे रक्षण करणे ही राष्ट्रीय जबाबदारी आहे, असे दार म्हणाले. पाकिस्तानातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या अणुकार्यक्रमात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानवरील परदेशी ऋणाचा बोजा १०० अब्ज डॉलर अथवा त्याहून कितीही अधिक वाढला तरीही आम्ही अणुकार्यक्रमापासून तसूभरही मागे हटणार नाही. या वेळी दार यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या दोन लेखांचा हवाला दिला. फुग्याप्रमाणे वाढत चाललेल्या कर्जाच्या बोजामुळे पाकिस्तानला आपल्या राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमाशी तडजोड करावी लागेल, असे त्या लेखांत सुचविण्यात आले होते.

आपल्या अणुकार्यक्रमात कपात करण्याची सूचना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी अलीकडेच एका चर्चासत्रादरम्यान पाकिस्तानला केली होती. त्यानंतर दार यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे.

दार यांनी केरी यांच्या सूचनेचा उल्लेख केला नाही, मात्र सिनेटचे अध्यक्ष रझा रब्बानी यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताझ अझिझ यांना याबाबतची माहिती सभागृहाला देण्यास सांगितले. भारताला सहकार्य करून दक्षिण आशियात असंतुलित वातावरण निर्माण न करण्याची विनंती अझिझ यांनी अमेरिकेला केली.