करोनाने जागात हाहाकार माजवला आहे. जगातील अनेक देशात करोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाने जोर धरला आहे. भारत, अमेरीकेसह अनेक देशांनी लस निर्माण केली आहे. दरम्यान पाकिस्तानने देखील चीनच्या मदतीने करोना लस बनवली आहे. ‘PakVac’ असे या लशीचे नाव ठेवण्यात आले आहे. लस तयार करण्याबाबत पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आम्ही कठीण आव्हानांतून बाहेर येत आहोत. आमच्या मित्रांद्वारे आम्ही अडचणींना संधींमध्ये रूपांतरित करण्याचे कार्य करीत आहोत.

“आम्हाला या कठीण काळात चीन जवळचा वाटला आहे, ज्यामुळे करोना संकटाला तोंड देण्यास आम्हाला मदत झाली आहे.” असे पाकिस्तानचे विशेष आरोग्य सहायक डॉ. फैसल सुल्तान म्हणाले.

डॉ. फैसल म्हणाले, “लस बनविण्यासाठी आम्हाला चीनने कच्चा मालाचा पुरवठा केला. तरी देखील हे काम सोपे नव्हते. लवकरच ही लस मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल.” पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन्स सेंटरचे प्रमुख असद उमर म्हणाले की, हा दिवस आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. तसेच पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी मंगळवारी या लशीच्या शुभारंभाच्या वेळी सांगितले की आपल्या देशात चीनच्या लशीला बरीच मागणी आहे. लोक देखील चीनी लशीला प्राधान्य देत आहेत आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकासारख्या लशी टाळत आहेत.

काही दिवसांपुर्वी पाकिस्तानमध्ये लशीचा तुटवडा पहायला मिळाला होता. चीनी बनावटीच्या सिनोव्हॅक लसचीही कमतरता होती आणि देशातील बर्‍याच शहरांमध्ये लस नसल्यामुळे लोकांना घरी परतावे लागले. दरम्यान पाकिस्तानमध्ये नवीक करोना केसेस मध्ये घट झाली आहे. तीन महिन्यांत प्रथमच पॉझिटीव्हीटी दर ४% च्या खाली आला आहे. गेल्या एका दिवसात पाकिस्तानमध्ये करोनाचे १७७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह आतापर्यंत देशात करोनाची १० लाख प्रकरणे समोर आली आहेत, पाकिस्तानच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.