करोना विषाणूचा भारतीय उपप्रकार पाकिस्तानात सापडलेला नाही असे करोना कृती गटाचे सूत्रधार असलेले मंत्री असाद उमर यांनी म्हटले आहे. विषाणूचा भारतीय उपप्रकार सापडला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा विषाणू थायलंडमधून येथे आल्याचे वृत्त आले होते.
थायलंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी असे म्हटले होते की, त्यांच्याकडे एक महिला पाकिस्तानातून ४ वर्षाच्या मुलासह आली होती व त्यांना विलगीकरणात ठेवले होते. त्यांच्यात विषाणूचा भारतीय उपप्रकार सापडला होता. थायलंडमध्ये करोनाची नवी लाट आलेली आहे. विषाणूच्या भारतीय उपप्रकाराचे रुग्ण पाकिस्तानातून आल्याचा दावा फेटाळताना नियोजन मंत्री असाद उमर यांनी सांगितले की, नॅशनल कमांड अँड आपरेशन सेंटर या संघटनेच्या माहितीनुसार थायलंडच्या दोन जणांना करोनाच्या भारतीय उपप्रकाराची लागण झाल्याचा दावा चुकीचा आहे.

कारण भारतीय उपप्रकार पाकिस्तानमध्ये आढळलेला नाही. ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका हे विषाणू प्रकार पाकिस्तानात आढळून आले आहेत, पण भारतीय उपप्रकार सापडलेला नाही. भारतातील बी.१.६१७ विषाणू उपप्रकार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम महाराष्ट्रात सापडला होता. आता हा विषाणू २१ देशांत सापडला आहे. थायलंडच्या सदर महिलेला दुसरीकडून विषाणूची लागण झाली असावी असे उमर यांनी सांगितले. थायलंडने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर १ मे पासून बंदी लागू केली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तानात मंगळवारी १९१०६ जणांना करोनाचा संसर्ग झाला असून ११३ बळी गेले आहेत. एकूण ८६४५५७ जणांना संसर्ग झाला असून ३६८४ बळी गेले आहेत.