मलेशियाच्या पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीचे पाकिस्तानस्थित आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली असून १५ कोटी रुपये किमतीचे ५६ किलो हेरॉइन जप्त केले आहे. पाकिस्तानातून आलेल्या लाकडी सामानांत हेरॉइन दडविण्यात आले होते.
पाकिस्तानातील एका कारखान्यात तयार करण्यात आलेल्या लाकडी सामानात एक विशेष कप्पा तयार करण्यात आला होता आणि त्यामध्ये अमली पदार्थ दडवून ठेवण्यात आले होते, असे पोलीस उपमहानिरीक्षक नूर रशीद इब्राहिम यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी अधिक तपासणी करू नये यासाठी हे अमली पदार्थ प्रचलित पद्धतीचा अवलंब करून कंटेनरमधून पाठविण्यात आले होते. एकूण ७२ पिशव्यांमध्ये हे हेरॉइन दडविण्यात आले होते.
या प्रकरणी पाकिस्तान आणि इंडोनेशियाच्या प्रत्येकी चार जणांना, तर दोन स्थानिकांना आणि एक स्थानिक महिला अशा ११ जणांना अटक करण्यात आली. तर दोन ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये पाकिस्तानच्या आणखी दोघा नागरिकांना अटक करण्यात आली.
पाकिस्तानातून चालणाऱ्या या तस्करीवर गेल्या वर्षीपासून आमची नजर होती. जप्त करण्यात आलेले हेरॉइन समुद्रमार्गे इंडोनेशियाला पाठविण्यात येणार होते.