News Flash

गैरप्रकारांची दखल घेण्याची गरज!

पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या निवडणूक आयोगाला कानपिचक्या

| August 15, 2018 02:12 am

पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन

निवडणुकांवरून पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या निवडणूक आयोगाला कानपिचक्या

इस्लामाबाद : पाकिस्तानात निवडणुकीच्या वेळी गैरप्रकार झाले असून निवडणू्क आयोगाने त्याबाबत प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची गरज आहे, अशा शब्दात पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी स्वातंत्र्यदिनी अधिकृत कार्यक्रमात बोलताना घरचा अहेर दिला. पाकिस्तानच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिना कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की सरकारी संस्था अधिक शक्तिशाली व निष्पक्ष करण्याची गरज आहे.

पाकिस्तानातील  सार्वत्रिक निवडणुकात पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या इमरान खान यांच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी तेथील निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी अनेक राजकीय पक्षांनी केल्या आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाचे अध्यक्ष शहाबाझ शरीफ यांनी काल असा आरोप केला की, २५ जुलैच्या निवडणुकीत कधी नव्हे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार झाले. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत नवाझ शरीफ यांच्या पक्षाला ८२ जागा मिळाल्या असून पाकिस्तान तेहरीक ए इन्साफला मित्र पक्षांसह एकूण १५८ जागा मिळाल्या आहेत.

अध्यक्ष हुसेन यांनी सांगितले, की हा देश लोकांच्या इच्छेनुसार अस्तित्वात आला आहे. त्याचा स्वातंत्र्य दिन व निवडणुकांच्या विजयाचा आनंद एकत्रित सादर होत आहे. पण देशाच्या भवितव्याचे निर्णय हे निष्पक्ष मतदानातूनच झाले पाहिजेत. पाकिस्तानातील आधीच्या सरकारने केलेल्या नवीन कायद्यानुसार निवडणूक आयोगाला अधिक बळ देण्यात आले असून निष्पक्ष कामाचा हेतू त्यात होता. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याबाबत सर्व देशात मतैक्य आहे,आधीच्या लोकप्रतिनिधींनी पाकिस्तान निवडणूक आयोगाला शक्तिशाली व निष्पक्ष करण्यासाठी प्रयत्न केले. असे असूनही निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या प्रमुख राजकीय पक्षांच्या तक्रारी आहेत. त्यांचे समाधानकारक निराकरण करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. निवडणूक आयोगाने मतदारांच्या व्यवस्थेवरील विश्वास वाढवणारे निर्णय घेणे अपेक्षित आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानीत ३१ तोफांची, तर राज्यांच्या राजधानीत २१ तोफांची सलामी देण्यात आली. सकाळी मशिदीत नमाज अदा केल्यानंतर महत्त्वाच्या सरकारी इमारतींवर पाकिस्तानचा ध्वज फडकावण्यात आला. जिना कन्व्हेन्शन सेंटर येथे अध्यक्ष हुसेन यांनी ध्वज फडकवला त्या वेळी काळजीवाहू नसीरूल मुल्क व तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते.

काश्मीरचाही उल्लेख

* अध्यक्ष हुसेन यांनी नेहमीप्रमाणे काश्मीर प्रश्न उकरून काढताना सांगितले,की पाकिस्तान काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रांतील ठरावानुसार काश्मिरी लोकांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी राजकीय व नैतिक पाठिंबा देत राहील. आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मिरी लोकांच्या हक्कांच्या प्रश्नावर आवाज उठवावा.

* पाकिस्तानी रेंजर्सकडून मिठाई वाटप

* बाघा सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना मिठाई दिली.

पाकिस्तानचे नियंत्रण लष्कराकडे असल्याने चर्चा व्यर्थ- विक्रम सूद

नवी दिल्ली : पाकिस्तानचे सगळे नियंत्रण लष्कराच्या हातात असल्याने त्या देशाशी चर्चा करणे व्यर्थ आहे, असे मत रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंगचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानने नेहमीच काश्मीर प्रश्नाची ढाल करण्याचा प्रयत्न केला व प्रत्येक गोष्टीत त्याचा संबंध जोडला असून पाकिस्तानातील लष्कर हे खतांपासून ब्रेडच्या कारखान्यांपर्यंत सर्व गोष्टी चालवत आहे. त्यामुळे तेथे लष्कर हीच एक मोठी कंपनी आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘द अनएंडिंग गेम- अ फॉर्मर रॉ चिफस इनसाइटस एस्पिनोएज’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी सूद यांनी सांगितले, की पाकिस्तानशी कुठलीही शांतता चर्चा उपयोगाची नाही, कारण ते भारताला शत्रू देश समजतात. काश्मीरचा मुद्दा वापरून तेथील लष्कराने पाकिस्तानचे नियंत्रण स्वत:कडे ठेवले आहे. लष्कर हा तेथे कंपनीक्षेत्राचाच भाग आहे. लष्कराच्या मालकीच्या जमिनी,मालमत्ता तर आहेतच, शिवाय लष्करच खताचे कारखाने, ब्रेडचे कारखाने,गव्हाच्या पीठाचे कारखाने चालवते. देशभरात गुंड व  हेरॉइन पुरवण्याचे काम ते करतात.

पाकिस्तानची मनोवृत्ती बदलणार नाही त्यामुळे पाकिस्तानशी जो शांतता प्रयत्न करील त्याला यश येणे अवघड आहे.

पाकिस्तानबरोबरचे संबंध मजबूत करण्याची इच्छा- पॉम्पिओ

वॉशिंग्टन : पाकिस्तानबरोबरचे संबंध मजबूत करण्याची इच्छा असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सांगितले. दक्षिण आशियातील सुरक्षा, स्थिरता व संपन्नता ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असे त्यांनी पाकिस्तानला ७२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा  देताना म्हटले आहे. त्यांनी सांगितले, की गेली सात दशके अमेरिका व पाकिस्तान यांचे संबंध भक्कम पायावर उभे आहेत. आगामी काळात हे संबंध आणखी वृद्धिंगत करण्याची गरज असून लोक व सरकार पातळीवर संपर्क वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील. दक्षिण आशियाची सुरक्षा, स्थिरता व भरभराट आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.

पाकिस्तानात नियोजित पंतप्रधान इमरान खान यांचा शपथविधी १८ ऑगस्टला होणार असून त्यांनी, पाकिस्तान व अमेरिका यांच्यातील संबंध आणखी वृद्धिंगत करण्यात यावेत असे म्हटले होते.

अमेरिकेने नुकतेच एक विधेयक संमत केले असून त्यात पाकिस्तानाची मदत कमी करण्याची तरतूद आहे.

आधी अमेरिकेची पाकिस्तानला वार्षिक मदत १ अब्ज डॉलर्सची होती. ती आता कमी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:12 am

Web Title: pakistan election commission should look into vote rigging allegations says mamnoon hussain
Next Stories
1 ब्रिटनच्या पार्लमेंटबाहेर मोटार आदळवण्याच्या घटनेत अनेक जखमी
2 BLOG : राष्ट्रध्वजाच्या योग्य सन्मानासाठी जाणून घ्या ‘ध्वजसंहिता’
3 वादग्रस्त मुद्दे आणि चर्चांमुळे भरकटू नका – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
Just Now!
X