‘पंजाबचा सिंह’ म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा नवाझ शरीफ यांच्याकडे पुन्हा एकदा पाकिस्तानची सत्ता आली आहे. त्यांच्या सरकारला कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. तिसऱ्यांदा ते पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत. देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला तेच संजीवनी देऊ शकतील, या भावनेतून मतदारांनी त्यांना कौल दिला आहे. तालिबानबाबत त्यांची भूमिका सौम्य आहे, हेही या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे.
पोलाद उद्योगातील सम्राट व नंतर राजकीय नेते बनलेल्या शरीफ यांची सत्ता १९९९ च्या बंडाळीत उलथवण्यात आली. मुशर्रफ यांचे विमान उतरू न देण्याच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात टाकले होते. नंतर त्यांना थेट सौदी अरेबियात पाठवण्यात आले. २००७ पर्यंत ते पाकिस्तानात परत आले नाहीत. मुशर्रफ यांना हटवण्यासाठी शरीफ यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीशी हातमिळवणी केली होती. या वेळीही त्यांचे कट्टर विरोधक मुशर्रफ सत्तेच्या आशेने मायदेशी परत आले, पण त्यांना तुरुंगात जावे लागले. एक प्रकारे नियतीने एक वर्तुळ पूर्ण केले. आता मुशर्रफ यांच्यावर बरेच आरोप लावण्यात आले आहेत. शरीफ यांनी सांगितले, की मुशर्रफ यांचा सूड घेण्याचा आपला इरादा नाही. परंतु आता त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप मात्र लावला जाणार आहे. १९९९ मध्ये जिथे आम्ही थांबलो होतो, तिथून आता आमचा प्रवास सुरू होईल, असे शरीफ यांनी म्हटले आहे.
शरीफ यांनी प्रचारात देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर भर दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांकात पाकिस्तान १८६ देशांत १४६ व्या क्रमांकावर आहे, त्यावरून देशातील लोकांचे राहाणीमान, आरोग्य, शिक्षण सुविधा यांच्यात अनेक कमतरता आहेत, त्या दूर करण्याची गरज आहे, असे शरीफ यांचे म्हणणे आहे. ‘मजबूत अर्थव्यवस्था, मजबूत पाकिस्तान’ अशी त्यांची घोषणा होती. पाकिस्तानात खासगी उद्योगांना व उद्यमशीलतेला प्राधान्य दिले जाईल, अशी सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली. त्याला जनतेने दिलेला हा कौल आहे. १९९०च्या सुमारास शरीफ यांनी पाकिस्तानात आर्थिक उदारीकरणास प्राधान्य दिले होते. त्यांचे देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे इरादे नेक असले तरी पाकिस्तानी तालिबानबाबत त्यांची भूमिका फार सौम्य आहे. तालिबानवर लष्करी कारवाई न करता त्यांना बोलणीस भाग पाडावे, असे त्यांचे मत आहे.
शरीफ यांचा जन्म १९४९ मध्ये एका धनाढय़ कुटुंबात लाहोर येथे झाला. त्यांचे शिक्षण खासगी इंग्रजी शाळांतून झाले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. नंतर ते वडिलांच्या पोलाद कारखान्यात काम करून लागले. कालांतराने ते राजकारणात आले. १९७०मध्ये तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांनी उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले त्या वेळी त्यांच्या पोलाद उद्योगास मोठा फटका बसला होता. माजी पंतप्रधान झिया उल हक यांच्या राजवटीत ते प्रथम पंजाबचे अर्थमंत्री व नंतर मुख्यमंत्री झाले. १९८५पर्यंत ते मुख्यमंत्री होते. १९९०मध्ये ते पंतप्रधान झाले. नंतर त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदच्युत करण्यात आले व बेनझीर भुत्तो पंतप्रधान बनल्या.