आंतरराष्ट्रीय दबावाला झुगारून देत पाकिस्तानने २००४ मधील गुन्ह्य़ात एका किशोरवयीन मुलाला फासावर लटकावले. मानवी हक्क गटांनी त्याला फाशी देण्यास विरोध केला होता. कारण त्याने गुन्हा केला तेव्हा तो बाल आरोपी होता. शफाकत हुसेन याला कराची येथील मध्यवर्ती कारागृहात भल्या पहाटे फाशी देण्यात आले. हुसेन हा पाकव्याप्त काश्मीरचा रहिवासी होता. २००४ मध्ये कराचीत एका सात वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याच्या आरोपावरून त्याला अटक केली होती. त्याची सर्व अपिले फेटाळण्यात आली होती.
सुरुवातीला त्याला १४ जानेवारीस फाशी देण्याचे ठरले होते, पण नंतर त्याच्या वयाच्या मुद्दय़ावरून वादंग झाल्याने फाशी लांबणीवर टाकण्यात आली. अनेक स्थानिक व आंतरराष्ट्रीय मानवी हक्क गटांनी त्याच्या फाशीला विरोध केला होता. त्याला बालगुन्हेगारी कायद्याचा फायदा मिळू शकला नाही. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क तज्ज्ञांनी म्हटले आहे की, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय संकेत पाळले नाहीत. छळ करून त्या मुलाकडून गुन्हा कबूल करून घेतल्याच्या आरोपाची चौकशी करण्यास संयुक्त राष्ट्रांनी सांगितले होते. पाकिस्तानच्या बालगुन्हेगारी न्याय व्यवस्थेनुसार वयाच्या अठरा वर्षांच्या आधी कुणी गुन्हा केला असेल
तर त्याला फाशी देता येत
नाही. फाशीला विरोध करणाऱ्या गटाच्या मते त्याच्या वयाकडे दुर्लक्ष करण्यात आले.