पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका दहशतवाद्याला फाशी देण्यात आले. पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलमधील हल्ल्यानंतर फाशीच्या शिक्षेवरची बंदी उठवण्यात आल्यानंतर ही सातवी फाशी आहे.
नियाझ महंमद हा पाकिस्तानी हवाई दलाचा माजी तंत्रज्ञ होता व त्याला मुशर्रफ यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात बुधवारी सकाळी येथील मध्यवर्ती तुरुंगात फाशी देण्यात आले.
नियाझ याला पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना जिवे मारण्याच्या कटात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याने हा प्रयत्न २००३ मध्ये केला होता. नियाझ हा खैबर पख्तुनावाला प्रांतातील स्वाबी जिल्ह्य़ातील आहे. त्याला हरिपूर येथील तुरुंगात आधी ठेवले होते. नंतर हेलिकॉप्टरने पेशावरला आणून फाशी देण्यात आले, असे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. प्रशासनाने यावेळी तुरुंगाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तुरुंग अधीक्षक यांनी पेशावरच्या जिल्हा न्यायाधीशांना पत्र पाठवून फाशीची देखरेख करण्यासाठी आपल्याला पाठवावे अशी विनंती केली होती.पाकिस्तानात आतापर्यंत फाशी देण्यात आलेल्या सातजणांमध्ये सहाजण हे मुशर्रफ यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणांमधील आहेत, तर एक जण २००९ मध्ये लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणातील होता. रावळपिंडी येथे १४ डिसेंबर २००३ रोजी पाकिस्तानी हवाई दलाच्या सहाजणांनी मुशर्रफ यांना ठार करण्याचा प्रयत्न केला.