इस्लामाबाद : भारताने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या केलेल्या चाचणीमुळे निर्माण झालेल्या अवकाश कचऱ्याचा धोका असल्याबाबत पाकिस्ताननेही चिंता व्यक्त केली आहे.

नासासह काही आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मिशन शक्ती अंतर्गत भारताने क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रहाचे तुकडे केल्यानंतर निर्माण झालेल्या कचऱ्याचा अवकाश स्थानकास धोका असल्याचे म्हटले होते. २७ मार्चला भारताने केलेल्या ऐतिहासिक चाचणीनंतर क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करणारा भारत हा अमेरिका, रशिया व चीन यांच्यानंतरचा चौथा  देश ठरला होता.

सोमवारी नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्रशासक जिम ब्रायडनस्टाइन यांनी भारताने क्षेपणास्त्र सोडून उपग्रहाचे तुकडे केल्याबाबत चिंता व्यक्त क रताना या तुकडय़ांमुळे अवकाश स्थानकाला धोका असल्याचे म्हटले होते. उपग्रहाचे एकूण ४०० तुकडे फिरत असून त्यातील काही तुकडय़ांचा धोका ४४ टक्क्य़ांनी वाढल्याचे वक्तव्य केले होते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे, की भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अवकाश स्थानकास धोका निर्माण झाला असून उपग्रहाचे तुकडे या अवकाश स्थानकाच्या कक्षेच्या वरच्या कक्षेत फिरत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे व ही बाब आम्हालाही चिंताजनक वाटते. पाकिस्तान हा अवकाशाचे निर्लष्करीकरण करण्याचा समर्थक असून समविचारी देशांबरोबर आम्ही काम करीत राहू व आंतरारष्ट्रीय विधी व्यवस्थेत याबाबत समस्यांचा निपटारा करण्यात काही त्रुटी असतील, तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. अवकाशाचा वापर हा शांततामय कामासाठीच झाला पाहिजे. सामाजिक व आर्थिक विकासासाठी निर्माण केलेल्या अवकाश तंत्रज्ञानाचा कुणी दुरुपयोग करता कामा नये. इतर देशही अशा चाचण्या करू शकतात.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय कायद्याचे या चाचणीने उल्लंघन झाले नसल्याचे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.