बलुचिस्तानातील हल्ल्यात भारताच्या ‘रॉ’ म्हणजे रीसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचे पुरावे आपण अमेरिकेत सादर करणार आहोत, अशी वल्गना करणाऱ्या पाकिस्तानला एक चिटोरेही सादर करता आले नाही. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एझाझ चौधरी यांनी कुठलीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यांच्या वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांबरोबर बैठका झाल्या, पण त्यांना काहीच पुरावे सादर करता आले नाहीत असे वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी शिष्टमंडळास लष्कर-ए-तोयबा व जमात उद दावा यांच्या कारवाया व मुंबई हल्ल्यातील सूत्रधार झाकी उर रहमान लख्वी याला सोडून देण्याच्या मुद्दय़ावर पाकिस्तानला अमेरिकेकडून कानपिचक्या देण्यात आल्या. चांगले अतिरेकी व वाईट अतिरेकी नसतात, या वाक्याला स्मरून पाकिस्तानने कारवाई करणे अपेक्षित आहे असे अमेरिकेने सुनावले.
अमेरिकेला आश्वस्त  करण्यासाठी पाकिस्ताननेही, आम्ही दहशतवादाच्या विरोधात लढण्यास वचनबद्ध आहोत, त्याचबरोबर लष्कर-ए-तोयबा व जमात उद दावा यांच्यावर कारवाई करणार आहोत, पण त्यांची पाकिस्तानातील लोकप्रियता जास्त आहे त्यामुळे कारवाई करणे जड जात आहे, अशी कबुली पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री एझाझ चौधरी यांनी दिली.
अमेरिकी दौऱ्याच्या अगोदर पाकिस्तानने भारताच्या पाकिस्तानमधील हस्तक्षेपाबाबत पुरावे सादर करण्याच्या जाहीर वल्गना केल्या होत्या. प्रत्यक्षात पाकिस्तानने कुठलेही पुरावे व कागदपत्रे दिलेली नाहीत. त्यांच्याकडे कागदपत्रे पाकिस्तानात असतीलही पण त्यांनी ती आम्हाला दिलेली नाहीत, असे अमेरिकी परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव चौधरी यांनी त्यांनी  परराष्ट्र उपमंत्री अँटनी जे. ब्लिंकेन, संरक्षण उपमंत्री ख्रिस्तीन वॉरमुख, अर्थ उपमंत्री अ‍ॅडम जे. झुबिन व अफगाणिस्तान -पाकिस्तान विशेष प्रतिनिधी डॅन फेल्डमन यांची भेट घेतली.