अखेर पाकिस्तान भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सोडण्यासाठी तयार झाले आहे. भारतीय सीमेत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना दुर्दैवाने भारताचे मिग २१ हे विमान पीओकेत पडले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने वैमानिक अभिनंदन यांना बंदी बनवले होते. अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तान तयार होण्यामागे कूटनीतिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानने जगभरातील महत्वाच्या देशांशी संपर्क केला होता. यामध्ये पी ५ या देशांचाही समावेश होता. भारत तीन पद्धतीने आक्रमक प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानने त्यांना सांगितले. भारतीय नौदलाच्या युद्धनौका कराचीकडे पाठवणे, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची योजना तसेच भारत आणि पाक सीमेवर सैनिकांची संख्या वाढवण्यात आल्याचे पाकने सांगितले होते.

पाकिस्तानने दिलेल्या माहितीमुळे विदेशी सरकारांनी त्वरीत भारताशी चर्चा केली. दरम्यान, भारताकडून हे वृत्त काल्पनिक असल्याचे सांगण्यात आले. भारतीय युद्ध नौका कराचीपासून दूरवरुन जात असल्याचे भारताने त्यांना सांगितले. तसेच या देशांकडे आकाशातून समुद्रातील हालचाली टिपण्याचे तंत्रज्ञान आहे. त्यांनी त्या माध्यमातून याची माहिती घ्यावी असेही म्हटले होते. भारताने पाकिस्तानमध्ये लष्करी नव्हे तर दहशतवादविरोधी कारवाई केल्याचे सांगितले. उलट पाकिस्ताननेच भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भारताने केला.

पाकिस्तानच्या किमान २० विमानांनी भारताच्या लष्करी चौक्यांकडे मार्गक्रमण केले तसेच एलओसीचेही उल्लंघन केल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समूहांना सांगितले. पाकच्या विमानांनी लेसर गाइडेड क्षेपणास्त्र सोडले. यातून भारताचे लष्करी तळ थोडक्यात वाचले, असे भारताने स्पष्ट केले. पाकिस्तानचा हा आक्रमकपणा गांभिर्याने घेतल्याचा संदेश भारताने पाकला पाठवला. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि पाक सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय लढाऊ विमान पाडल्याचे आणि दोन वैमानिक पकडल्याचा दावा केला. पण तो चुकीचा होता. या दाव्यांचा परिणाम पाकिस्तानच्या विश्वसनीयतेवर झाला.

पाकिस्तान खोटे दावे करत असल्याचे भारताने विदेशी सरकारांना सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिनेव्हा करारानुसार वागण्याची पाकिस्तानची जबाबदारी असल्याचे भारताने निक्षून सांगितले. पाकने वैमानिकाशी चांगली वर्तणूक करावी आणि त्याला त्वरीत भारतात पाठवावे असा संदेश दिला. वैमानिकाला सोडण्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा करार केला जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. जर वैमानिकाला नुकसान पोहोचवले किंवा त्याला सोडले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा, इशाराही दिला.

दुसरीकडे पाकिस्तानला एकटे पडल्याची भावना निर्माण झाली. पी ५ देशांपैकी कोणीही त्यांच्याबरोबर आले नाही. त्यातीलच काही देशांनी त्यांना दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचा सल्ला दिला. इतकेच काय तर यूएईनेही पाकिस्तानची मागणी धुडकावली. भारताला आयओसीचे दिलेले निमंत्रण मागे घ्यावे, अशी मागणी पाकने केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडे कोणताच पर्याय राहिला नाही.