भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी अद्याप कोणतीही बैठक ठरली नाही किंवा अशी कुठली विनंती देखील केलेली नाही असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी मंगळवारी म्हणाले. ते ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे झालेल्या ‘हार्ट ऑफ आशिया’ परिषदेच्या वेळी बोलत होते.

परिषदेत दोन्ही मंत्र्यांच्या सहभागामुळे आणि पाकिस्तान लष्कराकडून नुकत्याच झालेल्या शांतता कराराच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये संभाव्य बैठक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. कुरेशी यांनी रविवारी डॉन वृत्तपत्राला सांगितले की, “त्यांच्यात आणि जयशंकर यांच्यात कोणतीही बैठक ठरली नाही किंवा अशी विनंती देखील केली गेली नाही.”

भारत आणि पाकिस्तान या राजनैतिक संबंधांच्या पुर्नस्थापनासाठी शांतपणे वाटाघाटी करत असल्याच्या मीडियाच्या अनुमानांबद्दल विचारले असता कुरेशी म्हणाले, “अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही.” जयशंकर यांना गेल्या आठवड्यात प्रश्न विचारला होता की, परिषदेच्या वेळी आपण कुरेशी यांची भेट घेणार आहात का?, या प्रश्नाला त्यांनी विशिष्ट उत्तर दिले नाही.

ते म्हणाले की, “माझे वेळापत्रक ठरत आहे. आतापर्यंत अशी कोणतीही बैठक नियोजित केली आहे मला वाटत नाही,” असे त्यांनी २६ मार्च रोजी नवी दिल्ली येथील इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये सांगितले. आपला सहभाग जाहीर करताना परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी एक निवेदनात म्हटले आहे की जयशंकर ९व्या ‘हार्ट ऑफ आशिया’ -इस्तंबूल प्रक्रियेच्या मंत्री परिषदेत इतर सहभागी देशांच्या नेत्यांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने रविवारी सांगितले की परिषदेच्या वेळी कुरेशी हे “प्रमुख प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी सल्लामसलत” करतील.