शक्य तितकी दिरंगाई करीत पाकिस्तानने भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी रात्री सुटका केली. पंजाबातील वाघा सीमेवर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री ९ वाजून २० मिनिटांनी अभिनंदन यांनी मायभुमीत प्रवेश केला. अभिनंदन यांच्या सुटकेला जवळपास तीन तास उशीर झाला. भारतात पोहोचताच अभिनंदन यांना तातडीने त्यांना मोटारींच्या ताफ्यातून अज्ञात स्थळी नेण्यात आले.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना सीमारेषा पार करण्यासाआधी व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावल्यानेच दिरंगाई झाली. हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर पाकिस्तानी सरकारने लगेचच रात्री ९ वाजता मीडियासाठी तो रिलीजही केला. या व्हिडीओत अभिनंद आपण टार्गेट शोधण्यासाठी नियंत्रण रेषा पार केली होती, मात्र आपलं लढाऊ विमान कोसळलं असं सांगत आहेत.
‘पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी मला गर्दीपासून वाचवलं. पाकिस्तानी लष्कर अत्यंत शिस्तबद्ध असून आपण खूपच प्रभावित झालो आहोत’, असं अभिनंदन यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. हा व्हिडीओ एडीट करण्यात आला आहे असं दिसत आहे. कारण यामध्ये १५ कट आहेत.

भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा वेध घेत असताना त्यांचे मिग विमान अपघातग्रस्त होऊन २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. त्यावेळी पॅराशूटद्वारे उतरत असलेल्या अभिनंदनला पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या दोन चित्रफितीही पाकिस्तानने जारी केल्या होत्या. त्यात त्यांना मारहाण झाल्याच्या खुणाही जाणवत होत्या. भारताने या चित्रफितींना जोरदार आक्षेप घेत, जीनिव्हा करारानुसार अभिनंदन यांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली होती. अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीननेही पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची घोषणा केली होती.

अर्थात हे शांततेच्या दिशेने पाकिस्तानने टाकलेले पहिले पाऊल आहे, अशी बतावणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. तसेच भारताकडे चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. आधी अतिरेकी गटांवर ठोस कारवाई करा, मगच चर्चेचा विचार करू, असे भारताने त्यांना ठणकावले होते. त्यानंतर गेले दोन दिवस अभिनंदन यांच्या सुटकेकडे देशाचे लक्ष लागले होते.

शुक्रवारी दुपारी बारा वाजता अटारी सीमेवरून ते मातृभूमीवर पाऊल ठेवतील, असे आधी जाहीर झाले होते, त्यामुळे सकाळपासूनच या सीमेवर प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर, सेनादलांचे तसेच प्रशासकीय विभागांचे अधिकारी आणि हजारो नागरिक जमले होते. अभिनंदन मातृभूमीवर पाऊल टाकत असल्याचा क्षण साठवण्यासाठी जो तो धडपडत होता. मात्र संध्याकाळही उलटून रात्र झाली, तरी अभिनंदन भारतात न आल्याने लोकांमधील तणाव आणि उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पाकिस्तान करीत असलेल्या दिरंगााईबद्दलही संतप्त भावना व्यक्त होत होती. अखेर रात्री नऊनंतर अभिनंदन यांना घेऊन पाकिस्तानचे अधिकारी आणि सैनिक येत असल्याचे दूरचित्रवाहिन्यांवरून दिसताच देशभर आनंदाचे वातावरण पसरले.