पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर आपल्याच देशात असल्याची कबुली दिली आहे. मसूद अझहर सध्या आजारी असून घराबाहेर पडणंही त्याला शक्य होत नसल्याची माहिती शाह मेहमूद कुरेशी यांनी दिलेली आहे. सीएनएनशी बोलताना त्यांनी ही माहिती आहे. ‘मला मिळालेल्या माहितीनुसार तो आजारी आहे. तो इतका आजारी आहे की घराबाहेर पडणंही त्याला शक्य होत नाही आहे’, असं शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव येत असून अमेरिकेसह अनेक देशांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मसूद अझहरला आश्रय देणं पाकिस्तानला कठीण जात आहे. मसूद अझहरची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने भारतावर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदाराही जैश-ए-मोहम्मदने घेतली होती.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४१ जवान शहीद झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतला आहे. भारताने वारंवार मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं जावं यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र चीनने अडथळा आणल्याने नेहमीच भारताच्या पदरी निराशा पडली.

मसूद अझहरविरोधात पुरावे दिले तर कारवाई करु असंही शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं आहे. ‘जर भारताकडे न्यायालयात उभे राहू शकतील असे ठोस पुरावे असतील तर ते त्यांनी आमच्याकडे सोपवावेत. आम्ही त्याआधारे कारवाई करु’, असं शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं आहे.