पाकिस्तानात माध्यमांवर वाढत्या सेन्सॉरशीपच्या अनेक बातम्या मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या होत्या. या मुद्द्यावरून लंडनमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांना पत्रकाराच्या रोषाचा सामना करावा लागला. दरम्यान, कॅनडाच्या एका पत्रकाराने कुरेशी यांची पत्रकार परिषद मध्येच थांबवल्याचा प्रकार घडला. सरकारच्या तक्रारींनंतर आपले सोशल मीडिया अकाउंट सेन्सर करण्यात आल्याचाही आरोप सदर पत्रकाराने यावेळी केला.

माध्यमांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण झाले पाहिजे या मुद्द्यावर मत मांडण्यासाठी कुरेशी यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सदर घटना घडली. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणा’ने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची मुलाखत घेतल्याच्या कारणावरून तीन खासगी टिव्ही चॅनलचे प्रसारण बंद केले होते. पाकिस्तानची माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि झरदारी यांना माध्यमांमध्ये दिले जाणारे महत्त्व पाहता ते खांबवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला होता. यानंतर तीनची चॅनले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडेही चॅनलचे प्रसारण सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. दरम्यान, कॅनडाच्या रेबेल मीडिया या वेबसाइटच्या पत्रकाराने कुरेशी यांना पत्रकार परिदेदरम्यान मध्येच थांबवले. तसेच पाकिस्तान सरकारने केलेल्या तक्रारींमुळेच आपले ट्विटर अकाउंट सेन्सर केल्याचाही आरोप केला. पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

ट्विटरने आपले अकाउंट पूर्णत: बंद केले नाही. परंतु त्यांनी आपले एक ट्विट हटवले आहे. पाकिस्तानी कायद्याचे उल्लंघन केल्याचे सांगत त्यांनी ही कारवाई केल्याचे ट्विट संबंधित पत्रकाराने केले आहे. तसेच पाकिस्तानने आपल्याला सेन्सर केले असल्याचा इमेलही ट्विटरने आपल्याला केला असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानातील पत्रकार मुनिजा जहांगिर यांनी ट्विटरवर यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतरही कुरेशी यांना कार्यक्रमाचे निमत्रण दिले असल्याकारणाने पत्रकाराने आयोजकानाही खडेबोल सुनावले.