भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.


एएनआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी गुरुवारी पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली आहे. दोन्ही देशांतील तणावाचे वातावरण कमी होणार असेल तर आम्ही विंग कमांडर अभिनंद यांच्या सुटकेसाठी चर्चेस तयार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

मात्र, भारताने याचा विरोध केला असून पाकिस्तानकडून हा उघडपणे जिनिव्हा कराराचा भंग असल्याचे सांगताना त्यांच्याकडून कंदाहर सारखी मागणी केली जात आहे. मात्र, आम्ही या प्रकरणी कुठलीही चर्चा किंवा तडजोड करणार नाही, आधी तातडीने विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सुपूर्द करा अशी भुमिका भारताने मांडली आहे.

दरम्यान, भारताने दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमधील कुठल्याही चर्चेपूर्वी दहशतवादाविरोधात पाकिस्तानने ठोस पावले उचलावीत. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी आता यावर बोलायला हवं. हाच आमचा पाकिस्तान आणि आंतराराष्ट्रीय समुदायाला संदेश असल्याचे भारताने म्हटले आहे.