उच्चस्तरीय बैठकीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची घोषणा
भारतात पंजाबमधील पठाणकोट हवाई तळावरच्या  हल्ल्यातील दहशतवादी सूत्रधारांच्या तपासासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी  संयुक्त चौकशी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानातील सूत्रधारांचा असलेला सहभाग उघड करणे हा या पथकाचा हेतू आहे, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. शरीफ यांचा संयुक्त चौकशी पथक (जेआयटी) स्थापन करण्याचा निर्णय हा भारताने या हल्ल्याचा निर्णायक तपास झाला नाही तर परराष्ट्र सचिव पातळीवर इस्लामाबाद येथे १५ जानेवारीला होणारी चर्चा पुढे नेता येणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर जाहीर केला आहे. इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), इंटर सव्र्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) व लष्करी गुप्तचर (एमआय) यांची ही संयुक्त समिती असून उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान शरीफ यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचा हा निर्णय घेतला आहे.
अंतर्गत सुरक्षा मंत्री निवृत्त लेफ्टनंट जनरल निसार अली खान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासेर खान जानजुआ, पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज, पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार विषयक खास मदतनीस तारिक फातेमी व अर्थमंत्री इशाक दर या बैठकीला उपस्थित होते. पठाणकोट हल्ल्याच्या तपासात शरीफ यांनी सक्रिय भूमिका घेतली असून ते या हल्ल्याची पाळेमुळे खणून काढणार आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्याशी या मुद्दय़ावर चर्चा झाली असून त्यांना संयुक्त चौकशी समिती नेमल्याची माहिती देण्यात आली आहे. ही चौकशी व तपास म्हणजे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कसोटीचा भाग असून भारत-पाकिस्तान चर्चा पुढे नेण्यासाठी पठाणकोट हल्ल्याचा तपास करावाच लागणार आहे, कारण अनेकदा दोन्ही देशातील संवाद अशाच दहशतवादी हल्ल्यांमुळे खंडित झाला आहे. भारतीय गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी गटांनी हे हल्ले केले असून त्याची आखणीही त्यांनीच केली होती. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानला कारवाई करण्यायोग्य माहिती दिली आहे. त्यात आवाजांचे काही नमुने व मोबाईल क्रमांक यांचा समावेश आहे. ते क्रमांक पाकिस्तानातील आहेत. शरीफ यांनी भारतीय नेत्यांना तसेच अमेरिकेला असे आश्वासन दिले आहे की, पाकिस्तान या प्रकरणी सखोल चौकशी करून त्यातील निष्कर्ष जाहीर करेल.