मुंबईवरील हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याची आज रात्री नजरकैदेतून सुटका होणार आहे. मात्र, पाकिस्तान सरकार त्याला सुटकेपूर्वीच पुन्हा इतर आरोपांखाली कैदेत ठेवण्याची शक्यता आहे. सईदच्या वकिलांनी ही भीती व्यक्त केली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने सईदवर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्यावर जानेवारीत अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर वारंवार त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली. न्यूज १८ डॉट कॉम ने याबाबत वृत्त  दिले आहे.

पंजाब प्रांताच्या न्याय समीक्षा बोर्डाने सईदची ३० दिवसांची नजरबंदीची शिक्षा पूर्ण झाल्यावर सुटकेचे आदेश दिले होते. या आदेशांनुसार, आज (गुरुवार) मध्यरात्री सईदची सुटका होणे अपेक्षीत आहे. सईदचे वकिल ए. के. डोगर यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितले की, जर सरकारने सईदला इतर कुठल्याही आरोपांखाली पुन्हा ताब्यात घेतले नाही, तर त्याची सुटका होऊ शकते. त्यामुळे पंजाब सरकार सईदला इतर आरोपांखाली पुन्हा कैद करण्याची भिती आम्हाला आहे. दरम्यान, सईदच्या स्वागतासाठी लाहोरच्या जौहर गावात त्याच्या घराबाहेर जमात-उद-दावाच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र यायला सुरुवात केली आहे.

सईदची सुटका अशा वेळी होत आहे, जेव्हा त्याने मुंबईवर घडवून आणलेल्या हल्ल्याला येत्या २६ नोव्हेंबर रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले होते. तर दुसरीकडे पंजाब सरकारच्या गृहविभागाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, सईदची सुटका होणार नाही. कारण, दुसऱ्या एका प्रकरणात त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

डोगर काल म्हणाले होते की, हाफिज सईदला २९७ दिवस अवैधरित्या कैदेत ठेवण्यात आले आहे. सईदने नेहमीच पाकिस्तानसाठी काम केले. मात्र, सरकार त्याच्याविरोधात कुठलेही आरोप सिद्ध करु शकलेले नाही.

३१ जानेवारी रोजी सईदसह त्याचे चार सहकारी अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद आणि काजी कशिफ हुसैन यांना पाकिस्तानातील पंजाब सरकारने दहशतवादविरोधी कायदा १९९७ च्या चौथ्या अनुसूचीनुसार ९० दिवसांसाठी ताब्यात घेतले होते.