पाकिस्तान सरकार काश्मीरचा वाद सोडवण्यासाठी प्रस्ताव आणण्याची तयारी करत असल्याचा दावा पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी केला आहे. काश्मीरचा वाद सोडवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू असून एका आठवड्यात हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल असा दावा मजारी यांनी केला आहे.

पाकिस्तानमधील चॅनल 24 ला दिलेल्या एका मुलाखतीत मजारी यांनी हा दावा केला आहे. काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी प्रस्ताव बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सात दिवसात हा प्रस्ताव तयार होईल आणि कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल. त्यानंतर प्रस्तावावर सर्व विरोधी पक्षांशी चर्चा केली जाईल, असं मजारी यांनी सांगितलं.

पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात भारतासोबतचे संबंध चांगले बनवायचे आहेत असं म्हटलं होतं. दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या प्रस्नावरुन वाद आहे हे मान्य करताना इम्रान खान यांनी दोन्ही देशांनी चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील वाद सोडवता येतील असं म्हटलं होतं. संबंध सुधारण्यासाठी जर भारताने एक पाऊल उचललं तर पाकिस्तान दोन पावलं उचलेल असं इम्रान म्हणाले होते.

उल्लेखनीय म्हणजे माध्यमांतील वृत्तांनुसार, पुढील महिन्यात अमेरिकेमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक महासभेमध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यू यॉर्क येथे जाणार आहेत. त्यावेळी पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांची त्या भेट घेणार आहेत. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या भेटीबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.