अनोळखी हॅकर्सकडून पाकिस्तान सरकारची वेबसाईट काही वेळासाठी हॅक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या हॅकर्सनी भारताचे राष्ट्रगीत वेबसाईटवर पोस्ट केले. यासोबतच हॅकर्सकडून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छादेखील देण्यात आल्या. हॅकर्सकडून काही वेळ पाकिस्तान सरकारची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले. यानंतर काही वेळाने ही वेबसाईट पूर्ववत झाली.

पाकिस्तान सरकारची वेबसाईट हॅक झाल्याची माहिती काही ट्विटर वापरकर्त्यांनी ट्विटमधून दिली. हॅकर्सकडून वेबसाईटवर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यासोबत भारताचे राष्ट्रगीतदेखील वाजवण्यात आले. दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. यानंतर काही वेळानंतर वेबसाईट पूर्ववत करण्यात पाकिस्तान सरकारच्या कर्मचाऱ्यांना यश आले. याआधीही अनेकदा हॅकर्सकडून पाकिस्तानच्या वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत.

दोन महिन्यांआधी पाकिस्तान सरकारच्या तब्बल ३० वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या होत्या. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हा प्रकार घडला होता. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे.

याआधी पाकिस्तानी हॅकर्सकडून अनेकदा भारतातील प्रमुख संस्थांच्या वेबसाईट हॅक करण्याचे प्रकार घडले आहेत. चारच महिन्यांपूर्वी एका पाकिस्तानी हॅकर्सच्या गटाने भारताच्या चार प्रमुख विद्यापीठांच्या वेबसाईट्स हॅक केल्या होत्या. यामध्ये आयआयटी दिल्ली, आयआयटी वाराणसी, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाचा समावेश होता. यासोबतच आणखीही काही संस्थांच्या वेबसाईट्स पाकिस्तानी हॅकर्सकडून अनेकदा हॅक करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या वेबसाईट्स काही वेळातच पूर्ववत करण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर हॅकर्सकडून पुन्हा या वेबसाईट करण्यात आल्या. त्यानंतर या वेबसाईट्सवर भारतविरोधी मजकूर पोस्ट करण्यात आला.