पाकिस्तानात तेथील नागरिकांच्या आयुष्याचा कसा खेळ केला जात होता याचं उत्तम उदाहरण म्हणजे काही वैमानिक बनावट परवान्यांवर विमान उडवत असल्याचं प्रकरण. नुकतीच ही घटना समोर आली होती. दरम्यान, आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ५० वैमानिकांचे परवाने रद्द केले आहेत. याव्यतिरिक्त त्या वैमानिकांनी हे परवाने कोणत्या पद्धतीनं मिळवले हे तपासण्याचेदेखील आदेश इम्रान खान यांनी दिले आहेत. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणानं न्यायालयाला ही माहिती दिली आहे.
२२ मे रोजी कराची मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. त्यानंतर वैमानिकांच्या बनावट परवान्यांचं प्रकरण समोर आलं होतं. या घटनेत ९७ लोकांचे प्राण गेले होते. त्यानंतर पाकिस्तानातील मंत्री गुलाम सरवर खान यांनी माध्यमांशी संवाद साधताना ८६९ सक्रिय वैमानिकांपैकी २६० जणांचे परवाने बनावट असल्याचं किंवा त्यांना अनधिकृतपणे हे परवाने मिळवल्याचं सांगितलं होतं.
पाकिस्ताननं त्या वैमानिकांची नावं सार्वजनिक केली नव्हती. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थेच्या आवश्यकतांनुसार सरकारनं ८६० वैमानिकांच्या परवान्यांची तपासणी केली आहे. त्यानंतर त्यापैकी ५० वैमानिकांचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाला दिली असल्याचं पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉननं म्हटलं आहे. दरम्यान, त्या वैमानिकांनी अनधिकृत पद्धतीनं कसे परवाने मिळवले याचा तपास करण्याचे आदेशही तपास यंत्रणांना देण्यात आले आहेत. सीएएच्या एका अहवालानुसार आतापर्यंत २५९ वैमानिकांच्या परवान्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापूर्वी ६ जुलै रोजी २८ वैमानिकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. त्यानंतर त्या प्रस्तावाला ७ जुलै रोजीच मंजुरी देण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 20, 2020 5:12 pm