पाकिस्तानातील सत्तांतरानंतर पाकिस्तानी वृत्तपत्रात नवे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे अभिनंदन करणाऱ्या जाहिराती झळकत असल्या तरी त्यांना आता खुद्द शरीफ यांनीच विरोध केला असून यापुढे सरकारी समित्या वा उपक्रमांनी अशी जाहिरात दिली तर तिचे पैसे त्या उपक्रमाच्या प्रमुखाच्या पगारातून कापले जातील, असे बजावले आहे.
शरीफ यांचे अभिनंदन करणाऱ्या जाहिराती काही उद्योगांनी जशा दिल्या तशाच काही सरकारी संस्था, उपक्रम व समित्यांनीही या जाहिरातींचा रतीब सुरू केला होता. सरकारी उपक्रमांच्यावतीने अशा जाहिराती म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे, असे नमूद करीत शरीफ यांनी आपला आदेश मोडणाऱ्यावर कठोर कारवाई होईल, असे सांगितले आहे.
राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ता पोलीस विभाग तसेच नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानने शरीफ यांचे अभिनंदन करणाऱ्या मोठय़ा जाहिराती अनेक वृत्तपत्रांतून दिल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली आहे. या जाहिराती आपल्या कार्यक्षेत्राशी कोणत्या प्रकारे संबंधित आहेत, याचा खुलासा त्यांच्याकडे मागण्यात आला आहे. आपल्यावरील लोकांचे प्रेम मी समजू शकतो पण अशा अनाठायी उधळपट्टीऐवजी राष्ट्रउभारणीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे शरीफ यांनी स्पष्ट केले आहे.
झरदारींचा ‘षट्कार’!
पाकिस्तानी संसदेच्या १० जूनला होणाऱ्या अधिवेशनात राष्ट्राध्यक्ष या नात्याने असिफ अली झरदारी यांचे अभिभाषण झाले तर त्याद्वारे ते पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात एक विक्रम नोंदवणार आहेत. पाकिस्तानी संसदेच्या उभय सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात सहाव्यांदा अभिभाषण करणारे ते पहिले अध्यक्ष ठरणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत झरदारी यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे. त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले की संयुक्त अधिवेशनाची औपचारिक माहिती अध्यक्षांना अद्याप कळविली गेलेली नाही. पण शरीफ यांनी त्यांना अभिभाषणासाठी पाचारण केले तर ते जरूर भाषण करतील. संसदेच्या गेल्या अधिवेशनाच्या प्रारंभी शरीफ यांच्या पक्षाने झरदारी यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला होता. आता पाकिस्तानी घटनेनुसार अध्यक्षांच्या अभिभाषणानेच अधिवेशन सुरू होत असल्याने शरीफ सरकारने झरदारी यांना अभिभाषणास बोलावणे हादेखील एक काव्यगत न्याय ठरणार आहे!