पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या एका सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला तेथे पाकिस्तानी रेंजर्सनी चांगली वागणूक दिली. शुक्रवारी त्याला जम्मू क्षेत्रात भारताच्या हवाली करण्यात आले.
 गेल्या वर्षी पाकिस्तानी रेंजर्सनी सीमेवर क्रूरपणे दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला होता व नंतरही एक हल्ला करण्यात आला होता त्यात काही भारतीय जवान धारातीर्थी पडले होते त्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानी रेंजर्सनी आता या जवानाला चांगली वागणूक देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे. चिनाब नदीत बोटीवरचे नियंत्रण सुटून तो थेट पाकिस्तानात वाहात गेला होता. या जवानाचे नाव सत्यशील यादव असे असून त्याने पाकिस्तानातील वार्ताहरांना सांगितले की, आपली बोट अपघातानेच पाण्याच्या वेगवान प्रवाहात सापडून गस्तीच्या वेळी पाकिस्तानात आली होती. आपले सहकारी पोहून गेले पण आपल्याला पोहता येत नसल्याने बोटीसह आपण पाकिस्तानी किनाऱ्याला आलो. तेथे पाकिस्तानी रेंजर्सनी आपल्याला वाचवले. त्यांनी आश्वस्त केले. परिचय विचारला व त्यांनी चांगली वागणूक दिली त्याबद्दल आपण समाधानी आहोत. सत्यशील  हा अखनूर येथे गस्त घालीत असताना बोट पाण्याच्या जोरदार प्रवाहात सापडली. मोटारबोटचे इंजिन नदीच्या अरुंद भागात आदळून नादुरुस्त झाले होते. बोटीबरोबर ते पाकिस्तानात पोहोचले. ते सियालकोट किनाऱ्याला लागले.