संयुक्त राष्ट्र संघाने आपला जागतिक आनंदी देशांचा अहवाल सादर केला असून या अहवालात यंदा भारत १४० व्या स्थानावर पोहोचला आहे. गतवर्षीपेक्षा भारत ७ क्रमांकांनी घसरला आहे. फिनलँड सलग दुसऱ्या वर्षी सर्वोच्च स्थानी कायम आहे. विशेष म्हणजे भारत आपला शेजारी देश पाकिस्तानपेक्षाही पिछाडीवर आहे. संयुक्त राष्ट्राने बुधवारी आपला अहवाल प्रसिद्ध केला.

संयुक्त राष्ट्र महासभाने २०१२ मध्ये २० मार्च रोजी जागतिक आनंदी दिवस घोषित केला होता. संयुक्त राष्ट्र ही सूची ६ घटकांच्या आधारावर निश्चित करते. यामध्ये उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक अहवाल, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारतेचा समावेश आहे. या अहवालानुसार, मागील काही वर्शांत समग्र जागतिक आनंदात घसरण झाली आहे.

वर्ष २०१८ मध्ये यात भारत १३३ व्या स्थानी होता. तर यंदा तो १४० व्या क्रमांकावर आला आहे. संयुक्त राष्ट्राचा सातवा वार्षिक आंनदी देशांचा हा अहवाल जगातील १५६ देशांवर आधारित आहे. या देशातील नागरिक स्वत:ला किती आनंदी समजतात, यावर तो अवलंबून असतो. यामध्ये चिंता, उदासी आणि आणि क्रोधसहित नकारात्मक भावनांमध्ये वृद्धी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

फिनलँडला सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वांत आनंदी देश मानले गेले आहे. त्यानंतर डेन्मार्क, नॉर्वे, आईसलँड आणि नेदरलँडचे स्थान येते. या अहवालानुसार पाकिस्तान ६७ व्या स्थानी, चीन ९३ व्या स्थानी आणि बांगलादेश १२५ व्या स्थानी आहे. युद्धग्रस्त दक्षिण सुदान येथील नागरिक सर्वाधिक नाखूश आहेत. त्यानंतर मध्य अफ्रिकन गणराज्य (१५५), अफगाणिस्तान (१५४), टांझानिया (१५३) आणि रवांडा (१५२) यांचा क्रम येतो. जगातील सर्वांत श्रीमंत देशांपैकी एक असलेला अमेरिका मात्र आनंदात १९ व्या स्थानी आहे.