काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली आहे. यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी न्यूयॉर्कला जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष विमानालाही पाकिस्तानने परवानगी नाकारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोदींच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठी पाकने आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास मोदींच्या विमानाला परवानगी नाकारली आहे. यासाठी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे कारण दिले आहे.

पाकिस्तान रिडिओने परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. त्यांनी म्हटले की, जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेले ‘मानवाधिकारांचे उल्लंघन’ आणि ‘काळा दिवस’च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान कथित स्वरुपात काश्मिरींच्या समर्थनार्थ रविवारी काळा दिवस पाळणार आहे.

कुरेशी यांनी म्हटले की, भारतीय उच्चायुक्तांना या निर्णयाची माहिती लिखित स्वरुपात देण्यात येत आहे. मोदी सोमवारी सौदी अरेबियाला जाणार आहेत. तिथे ते आंतरराष्ट्रीय व्यापार फोरममध्ये भाग घेणार आहेत. तसेच यावेळी ते सौदीच्या नेतृत्वासोबत चर्चाही करणार आहेत.

यापूर्वी सप्टेंबर महिन्यांत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाताना पाकिस्तानने पंतप्रधान मोदींच्या विमानाला त्यांची हवाई हद्द वापरण्याची परवानगी नाकारली होती. त्याशिवाय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यासाठी देखील पाकिस्तानने हवाई हद्द खोलण्यास परवानगी नाकारली होती.

फेब्रुवारीमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळांवर एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे.