दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने २६/११ मुंबई हल्ला प्रकरणातील मुख्य सरकारी वकील अझहर चौधरी यांना खटल्यातून हटवले आहे. सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे काम करत नसल्याचे कारण देत त्यांना पदावरून काढण्यात आले आहे. दरम्यान, हे प्रकरण हाताळत असलेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी पाकच्या या निर्णयावर टीका केली आहे. २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांना वाचवण्यासाठीचा हा पाकिस्तानचा डाव असल्याचा आरोप निकम यांनी केला आहे. डेव्हिड हेडलीच्या साक्षीमुळे दबावात आलेल्या पाकिस्तानकडून ही कृती झाल्याचेही ते म्हणाले.

अझहर चौधरी यांना पदावरून हटवल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली. गृहमंत्रालयाने तपास संस्थेचे विशेष वकील अझहर चौधरी यांना या हायप्रोफाइल खटल्यातून हटवले आहे. ते २००९ पासून मुंबई हल्ला प्रकरणावर काम करत होते. मुंबई हल्ल्याप्रकरणी तुमच्या सेवेची आणखी गरज नसल्याचे चौधरी यांना सांगण्यात आल्याचे तपास संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

चौधरी यांना फक्त मुंबई हल्ला प्रकरणातून हटवण्यात आले आहे. सध्या तरी ते पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात सरकारचे प्रतिनिधीत्व करतील, असे या अधिकाऱ्याने म्हटले. चौधरी ज्या पद्धतीने मुंबई हल्ल्याचा खटला पुढे नेत होते. त्यामुळे सरकार आणि त्यांच्यातील वाद वाढत होता. त्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आले. दरम्यान, चौधरी यांना पदावरून हटवल्याप्रकरणी अधिकृतरित्या कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

दरम्यान, मुंबई हल्ल्यावरील खटल्याला आता दहा वर्षे झाली आहेत. अद्याप या प्रकरणी कोणत्याही आरोपीला शिक्षा झालेली नाही. लष्कर-ए-तोयबाचे १० दहशतवादी नोव्हेंबर २००८ मध्ये कराचीहून बोटीतून मुंबईला आले होते. या दहशतवाद्यांनी मुंबईत ताज हॉटेल, सीएसएमटीसह अनेक ठिकाणी हल्ला केला होता. यामध्ये १६६ लोकांना आपला जीव गमवावा लागला तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.