28 May 2020

News Flash

पाकिस्तानकडून टोकाचं पाऊल; इतिहासात पहिल्यांदाच रोखली ‘ही’ सेवा

दोन्ही देशातील दुवा असलेली सेवा कायम अखंडित होती

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्यानं कुरापती केल्या जात असून, आता दोन्ही देशांमधील महत्त्वाची सेवा बंद करण्याचं टोकाचं पाऊल पाकिस्ताननं उचललं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पाकिस्तानकडून दोन्ही देशातील टपाल सेवा बंद करण्यात आली असून, दोन्ही देशांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सेवा खंडित झाली आहे.

भारत-पाकिस्तान फाळणी झाली. त्यानंतर दोन्ही देशात तीन वेळा युद्ध झालं. त्यानंतरही दोन्ही देशात कायम तणाव कायम राहिला. पण, दोन्ही देशातील नागरिकांच्या संवादातील महत्त्वाचा दुवा असलेली टपाल सेवा अखंडित सुरू होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० रद्द करण्याबरोबर राज्याचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करत पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती करण्यास सुरूवात केली. हा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तानकडून सातत्यानं जागतिक स्तरावर आवाज उठवण्याबरोबरच सीमेवर तणाव निर्माण प्रयत्न केले जात आहे. गेल्या महिन्यात पाकिस्ताननं राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णयही घेतला होता.

दरम्यान, दोन्ही देशातील नागरिकांच्या संवादाचं माध्यम असलेली टपाल सेवा पाकिस्तानकडून बंद करण्यात आली आहे. २७ ऑगस्टला पाकिस्तानकडून पत्राचं अखेरच पार्सल स्वीकारण्यात आलं असून, भारतासोबतची टपाल सेवा स्थगित करण्यात आल्याचं शेरा मारण्यासाठी भाग पाडलं जात आहे. यासंदर्भात बोलताना टपाल सेवेचे संचालक आर. व्ही. चौधरी म्हणाले, “पाकिस्तानकडून एकतर्फी निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रकारची भूमिका पाकिस्ताननं प्रथमच घेतली आहे. पाकिस्तानकडून केव्हा टपाल स्वीकारले जाईल हे सांगता येणार नाही,” असं चौधरी म्हणाले. दरम्यान, दिल्लीतील आंतरराष्ट्रीय कार्यालयाचे अधीक्षक सतीश कुमार म्हणाले,”जवळपास सर्वच टपाल पाकिस्तानला पाठवण्यात आले आहेत. पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील टपाल जास्त आहे. यात शैक्षणिक आणि साहित्यीक साहित्य आहे,” असं ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय टपाल सेवेसाठी देशभरात २८ परदेशी पोस्ट ऑफिस कार्यरत आहेत. पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या टपालाचं काम फक्त दिल्ली व मुंबई कार्यालयातून चालतं. तर राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहाराचं काम मध्य दिल्लीतील कोटला मार्गवरील नोडल संस्थेकडून केले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 12:10 pm

Web Title: pakistan has stopped postal mail between the two countries bmh 90
Next Stories
1 आरेतील वृक्षतोडीबाबत आज सुनावणी
2 पंतप्रधानांच्या मध्यस्थीनंतर अमोल यादव यांना उड्डाण परवाना मंजूर
3 भारताच्या कारवाईत ६ पाकिस्तानी सैनिक ठार
Just Now!
X