पाकिस्तानने या वर्षी आंतरराष्ट्रीय सीमा आणि लाइन ऑफ कंट्रोलवर ७२० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. मागील सात वर्षांतील शस्त्रसंधी उल्लंघनाचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर यावर्षी, ऑक्टोबरपर्यंत ७२४ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर २०१६ मध्ये पाक सुरक्षा दलांकडून ४४९ वेळा शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना घडल्या होत्या.

मंत्रालयातील आकडेवारीनुसार ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेत १२ नागरिक आणि १७ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आहेत. इतकेच नव्हे तर या गोळीबारात ७९ नागरिक आणि ६७ सैनिकही जखमी झालेत. पाकिस्तान आणि भारत यांच्यादरम्यान नोव्हेंबर २००३ पासून आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. पण, पाकिस्तानकडून वारंवार या कराराचे उल्लंघन केले जाते. पाकिस्तानबरोबर भारताची ३,३२३ किलोमीटर लांब सीमा आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमध्ये २२१ किमी लांब आंतरराष्ट्रीय सीमा तर ७४० किमी लांब एलओसी सीमा आहे.

पाकिस्तान सेनेकडून २०१६ मध्ये शस्त्रसंधीच्या ४४९ घटना घडल्या होत्या. यामध्ये १३ नागरिक आणि तितक्याच सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर ८३ नागरिक आणि ९९ जवान जखमी झाले होते. तर २०१४ मध्ये पाकिस्तानने ५८३ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यामध्ये १४ नागरिक आणि ३ जवानांचा मृत्यू झाला होता.