जगभरात दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांना पाकिस्तान मदत करीत असून मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या लष्कर ए तोयबासारख्या संघटनांशीही या देशाचे घनिष्ट संबंध असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकाच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
पाकिस्तान हा असा देशा आहे की, जिथे अनेक दहशतवादी गट सक्रिय आहेत आणि या गटांना पाकिस्तानकडून मदत मिळते. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून मार्गदर्शन मिळणाऱ्या लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी गटाने मुंबईतील हॉटेलवर हल्ला करून निरपराधांचे बळी घेतल्याचा आरोप मायकेल शीहन यांनी केला आहे. मायकेल शीहन यांनी १९९८ ते २००० या काळात अमेरिकेच्या दहशतवादविरोधी कारवाई करणाऱ्या पथकाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले होते.
मंगळवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या संमेलनात बोलताना मायकेल यांनी लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या वेळी पाकिस्तानकडून दहशतवादी गटांना मदत मिळत असल्याबाबतचे विधान केले.
काश्मीर वा भारतावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या संघटना उद्या हीच शस्त्रे आपल्याविरोधात वापरू शकतात. मात्र पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान सरकार अशा प्रकारची आगळीक करण्याची शक्यता नाही. सध्या तरी याबाबत कोणतीच लक्षणे वा पुरावा दिसत नसला तरी पुढे घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचेही मायकेल शीहन यांनी सांगितले.