कुरापतींसाठी प्रसिद्ध असलेल्या देशाने अर्थात पाकिस्तानने भारताकडे चर्चेसाठी भीक मागणार नाही, दोन देशांमधले संबंध सुधारायाचे असतील तर चर्चा करावीच लागेल, अशी भूमिका घेतली आहे. सीमेपलिकडून होणऱ्या गोळीबाराविरोधात अखेर पाकिस्तानाने तोंड उघडले आहे. मात्र त्यातही पाकिस्तानची भूमिका ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशीच आहे. पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत, भारताला पाकिस्तानसोबत चर्चा करावीच लागेल, पाकिस्तान कशाचीही भीक मागणार नाही असे म्हटले आहे. भारतीय जवानांच्या मृतदेहांची पाकिस्तानकडून विटंबना होते, शस्त्रसंधीचे उल्लंघनही करण्यात येते. अशात सगळ्या प्रकारात आता अब्दुल बसित यांनी थेट मोदींनाच इशारा दिला आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मे महिन्यात पाकिस्तानकडून दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. त्याबाबत जेव्हा बसित यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हा प्रश्न टाळत निघून जाणे पसंत केले होते. निरुत्तर झालेल्या या उच्चायुक्तांनी आता मात्र भारतालाच थेट आव्हान दिले आहे. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध तणावाचे झाले आहेत. याआधीही पाकिस्तानने शांत राहण्याचे मान्य करत भारताच्या कुरापती अनेकदा काढल्या आहेत. घुसखोरी, दहशतवादी हल्ले, काश्मीरच्या तरुणांची माथी भडकवणे हे सगळे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. उरी मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्यदलाकडून सर्जिकल स्ट्राईकही करण्यात आला होता. आता मात्र पाकिस्तानाच्या उच्चायुक्तांनी थेट मोदींनाच आव्हान दिले आहे. या भूमिकेला ‘भारत करारा जवाब’ देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.