पाकिस्तानात तालिबान्यांकडून सुरू असलेल्या हिंसाचारावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांना पाकिस्तानी तालिबान्यांनी प्रतिसाद दिला असून उत्तर वझिरिस्तानमधील अज्ञात स्थळी बुधवारपासून दोन्ही बाजूच्या शिष्टमंडळांची थेट शांती चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानी तालिबान्यांसोबत सुरू असलेल्या दीर्घ संघर्षांत आतापर्यंत ४० हजार जणांचा बळी गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
तालिबान्यांशी शांतता चर्चेची तयारी सुरू असतानाच गेल्या महिन्यात बंदी घातलेल्या दहशतवादी गटाने पाकिस्तानच्या अपहरण केलेल्या २३ अर्धसैनिक दलातील सैनिकांची हत्या केली होती.  त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानी लष्कराने पश्चिमोत्तर भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात हवाई हल्ल्याचा वापर केला. त्यानंतर तालिबान्यांनी महिन्याभराची युद्धबंदी जाहीर केली होती. मात्र ही युद्धबंदी तालिबान्यांनी कायम ठेवावी आणि शांतता चर्चेला प्रतिसाद द्यावा, अशी आशा पाकिस्तानी सरकारने व्यक्त केली आहे.