काश्मीर मुद्यावरुन भारताला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची तयारी करणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच वकिलाने झटका दिला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील पाकिस्तानी वकिल खावर कुरेशी यांच्या वक्तव्यामुळे इम्रान खान पुन्हा एकदा उघडे पडले आहेत. इम्रान खान यांनी त्यांच्या टि्वटमधून भारतावर नरसंहाराचे आरोप केले होते.

काश्मीरमधल्या नरसंहाराच्या आरोपांची पृष्टी करण्यासाठी भक्कम पुरावे नसल्याची कबुली खावर कुरेशी यांनी दिली आहे. सबळ पुराव्यांअभावी आंतरराष्ट्रीय न्यायालयात हे प्रकरण नेणे पाकिस्तानसाठी खूप कठीण आहे असे खावर कुरेशी यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचे दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याची धमकी दिली आहे.

संयुक्त राष्ट्रातही पाकिस्तान हा मुद्दा उपस्थित करणार आहे. पाकिस्तानने जगातल्या अनेक देशांकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पण त्यांना अमेरिकेसह जगातल्या कुठल्याही देशाकडून साथ मिळालेली नाही. काश्मीर प्रश्नी पाकिस्तान पूर्णपणे एकाकी पडला असून संयुक्त राष्ट्राने सुद्धा हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे. जगाने काश्मीरच्या विषयामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी त्यांनी दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न असल्याचेही सूचित केले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.