इम्रान खान यांच्या नि:शुल्कच्या घोषणेवर पाकिस्तानचे घूमजाव

कर्तारपूर मार्गिकेचा वापर करून शनिवारी गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूकडून २० डॉलर सुविधा शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानने भारताला कळविले आणि गुरुवारीच केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा घूमजाव केले.

कर्तारपूर मार्गिका उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे तर गुरू नानक देव जयंती समारंभ १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दोन्ही दिवशी यात्रेकरूंकडून शुल्क आकारण्यात येणार नाही, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या आठवडय़ात केली होती. त्यानंतर गुरुवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते.मात्र कर्तारपूर मार्गिकेचा वापर करून शनिवारी गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूकडून २० डॉलर शुल्क आकारण्यात येणार असल्याचे पाकिस्तानने भारताला कळविले आहे, असे सूत्रांनी सांगितले. तथापि, ५५० जणांचा अधिकृत जथा अथवा शिष्टमंडळ यांच्याकडूनही शुल्क आकारण्यात येणार आहे का, ते  कळू शकले नाही.

प्रतिमा आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचा पाकिस्तानचा उद्देश

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेला पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था आणि प्रतिमा सुधारण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. यात्रेकरूंकडून वार्षिक रक्कम मिळवितानाच आपण मवाळ देश असल्याचे सिद्ध करण्याची संधी पाकिस्तानला कर्तारपूर मार्गिकेमुळे मिळाली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी इम्रान खान यापूर्वीच्या सरकारवर सातत्याने जागतिक पातळीवरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काहीही करीत नसल्याची टीका करीत होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पावले उचलली. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इम्रान खान यांनी कर्तारपूर मार्गिकेचा पायाभरणी कार्यक्रमही केला. गेल्या दोन दशकांत पाकिस्तानची अर्थव्यवस्था हिंसाचार आणि दहशतवादामुळे रसातळाला गेली आणि व्यापारासाठी पोषक देश नसल्याची प्रतिमाही समोर आली. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी धार्मिक पर्यटनाची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होणार असल्याने भारतातून येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूकडून पाकिस्तानने २० डॉलर शुल्क आकारण्याचे ठरविले आहे.