गेल्या अनेक वर्षांपासून सुरळीतपणे सुरू असलेल्या भारत-पाकिस्तान दोस्ती बस सेवेवर बुधवारी पहिल्यांदाच मर्यादा आल्या. नवी दिल्ली ते लाहोर अशी सुरू असलेली ही बस सेवा आता वाघा सीमारेषेपर्यंतच मर्यादीत करण्यात आली आहे.
पाकिस्तानात दहशतवादी कारवाया वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान बससेवा वाघा सीमेपर्यंत मर्यादीत करण्यात येत असल्याची माहिती पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाने(पीटीडीसी) प्रसारीत केली आहे.
पाकच्या पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान दोस्ती बस सेवेचे नियंत्रण पूर्णपणे वाघा सीमारेषेवरील उप-कार्यालयावर केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार नवी दिल्ली आणि अमृतसर येथे जाण्यासाठी प्रवाशांना वाघा सीमेवरून बस पकडावी लागेल तर, पाकिस्तानात येणाऱया प्रवाशांना लाहोर ऐवजी वाघा सीमेवरच उतरावे लागेल. पेशावरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बस सेवेतील तपासण्यांमध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तानात वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पीटीडीसीच्या अधिकाऱयांनी सांगितले आहे.