पाकिस्तानने जम्मू-काश्मीर पुंछ जिल्ह्यातील शहापूर, किर्नी आणि कसबा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबारासह उखळी तोफांचा देखील मार करण्यात आला. भारतीय जवान पाकिस्तानच्या या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर देत आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या नागरीवस्त्यांना लक्ष्य केले होते. नियंत्रण रेषेवरील गावांवर पाकिस्तानकडून गोळीबारासह तोफगोळयांचा मारा केला होता. यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाले होते.

जम्मू-काश्मीर भागातील एलओसीवर ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात ९५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. त्यांनी यावेळी हे देखील सांगितले की, भारतीय जवानांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना वेळोवेळी चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलेले आहे.

भारत सरकारने जम्म-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान अधिकच चिडलेला आहे. परिणामी पाकिस्तानकडून सर्वप्रकारे भारतविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय दहशतवाद्यांना भारताता घुसखोरीसाठी मदत देखील केली जात आहे.

पाकिस्तानकडून या वर्षात १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत तब्बल २ हजार ३१७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. तर, भारतीय जवानांकडून एलओसीवरील व काश्मीर खोऱ्यातील विविध कारवायांमध्ये १४७ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेकडून ही माहिती देण्यात आली होती.