नवी दिल्ली : कर्तारपूरला जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूकडून २० डॉलर सेवाशुल्क आकारण्याबाबत पाकिस्तान आग्रही असल्याबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली असून या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन पाकिस्तानला केले आहे. असे असले तरी कर्तारपूर मार्गिका सुरू करण्याबाबत २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसमवेत करार करण्याची तयारी भारताने दर्शविली आहे.

गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त भारतातील आणि परदेशातील भारतीयांना गुरुद्वाराला भेट देता यावी यासाठी कर्तारपूर मार्गिका खुली करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारतातील यात्रेकरूंना कर्तारपूरला भेट देता यावी यासाठी बहुसंख्य बाबींबद्दल समझोता झाला असतानाही प्रत्येक भाविकाकडून प्रत्येक भेटीसाठी २० डॉलर सेवाशुल्क आकारण्याबाबत पाकिस्तान आग्रही असल्याने त्याबाबत भारताने नाराजी व्यक्त केली आहे.

गुरुद्वारा कर्तारपूर साहिबला व्हिसाविना भेट देण्याची यात्रेकरूंची दीर्घकाळापासूनची मागणी  आणि ही मार्गिका वेळेत सुरू करण्यासाठी भारताने २३ ऑक्टोबर रोजी मार्गिकेबाबत पाकिस्तानशी करार करण्याची तयारी दर्शविली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. असे असले तरी यात्रेकरूंकडून सेवाशुल्क आकारण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असे भारताने म्हटले आहे.