पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’चे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप अमेरिकेच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावरून आरोपांच्या फेऱ्यात सापडलेल्या पाकिस्तानचा ‘छुपा चेहरा’ पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.

‘आयएसआय’चे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत, असे मरिन कॉर्प्स जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी ‘सिनेट आर्म्ड सर्व्हिस कमिटी’समोर सांगितले. पाकिस्तानशी राजनैतिक चर्चा होऊ शकली नाही तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी तयार आहेत, असे अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी सांगितले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मॅटिस यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला सुनावले होते. दहशतवाद हा जगासाठी धोकादायक आहे. दहशतवादी संघटनांना कारवायांसाठी प्रोत्साहन दिल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दिला होता. मॅटिस हे नुकतेच भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळीही त्यांनी पाकिस्तानला ठणकावले होते. भारत आणि अमेरिका एकत्रितपणे दहशतवादाचा बिमोड करतील, असे ते म्हणाले होते. तालिबान आणि अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनशी संबंध असल्याच्या आरोपांवरून अनेकदा पाकिस्तानला टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यात आता अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी आरोप केल्याने पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.