पंतप्रधानांचा प्रचारसभेत आरोप

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली आहे. पाकिस्तान या निवडणुकीत हस्तक्षेप करत असून, काँग्रेस नेते अलीकडेच पाकिस्तानच्या नेत्यांना कशासाठी भेटले, याचे  स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केली.

पाकिस्तान लष्कराचे माजी महासंचालक सरदार अर्शद रफीक यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना मुख्यमंत्री करा असे आवाहन केले होते, असा दावा पंतप्रधानांनी केला. पाकिस्तानच्या ज्येष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी माझा नीच असा उल्लेख केल्याचा दावा मोदींनी केला. मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी ही बैठक झाल्याचे माध्यमांनीच वृत्त दिले. त्या बैठकीला पाकिस्तानचे उच्चायुक्त, माजी परराष्ट्र मंत्री, भारताचे माजी उपराष्ट्रपती तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे उपस्थित होते असा दावा मोदींनी केला. तीन तास ही बैठक झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. एका बाजूला पाकिस्तानच्या लष्कराचे माजी अधिकारी गुजरातच्या निवडणुकीत हस्तक्षेप करतात तर दुसरीकडे अय्यर यांच्या निवासस्थानी पाकिस्तानमधील काही व्यक्तींची बैठक होते. या घटना पाहता पाकिस्तान गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला.