ज्या कारणावरून गेल्या वेळी भारत-पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा ऐन वेळी रद्द करावी लागली, त्याची पुनरावृत्ती आता होऊ घातलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील २३ ऑगस्टच्या चर्चेतही होत असून पाकिस्तानने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज व भारताचे समपदस्थ अजित डोव्हल यांच्यात ही चर्चा होणार आहे पण आता पाकिस्तानच्या या कुरापतखोरपणामुळे या चर्चेचे भवितव्य अधांतरी आहे. या चर्चेत भारताने पाकिस्तानला जिवंत पकडलेला अतिरेकी महंमद नावेद याच्या राष्ट्रीयत्वाचे पुरावे देण्याचे ठरवले होते. पाकिस्तानच्या दहशतवादाबाबत भारत आता सज्जड पुरावे देईल व आपली पंचाईत होईल, या भीतीनेच पाकिस्तानने हे कुभांड रचले आहे व पाकिस्तानलाच चर्चा नको आहे हेच यावरून स्पष्ट झाले आहे.
एका वृत्तवाहिनाने दिलेल्या या वृत्तानुसार सरताज अझीज यांनी सय्यद अली शाह गिलानी, मीरवैझ फारूख व यासिन मलिक या फुटीरतावादी नेत्यांसह अनेकांना भोजनाचे व चर्चेचे निमंत्रण दिले आहे.
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ व आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मंगळवारी भेट घेतली होती व त्यात सरताज अझीज यांच्या भारत दौऱ्यातील बैठकीबाबत चर्चा झाली. अझीज हे २३ ऑगस्टला भारतात येत असून ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्याशी चर्चा करणार आहेत. शरीफ यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेत कुठल्या मुद्दय़ांचा समावेश करावा याबाबत लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. भारताने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानबरोबर होणारी परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा ऐन वेळी रद्द केली होती कारण त्या वेळी बैठकीच्या अगोदरच पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी काश्मीरच्या फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा केली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील २३ व २४ ऑगस्टची चर्चा पंतप्रधान नवाझ शरीफ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियात उफा येथे गेल्या महिन्यात जी बैठक झाली होती, तेव्हा ठरली होती. त्या वेळच्या संयुक्त निवेदनानुसार या चर्चेत दहशतवादाशी संबंधित सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याचेही मान्य करण्यात आले होते. अलिकडेच पाकिस्तानने पंजाब व काश्मीर येथे दोन दहशतवादी हल्ले केले होते तसेच इस्लामाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रकुल संसदीय बैठकीसाठी जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना निमंत्रित करण्यास नकार दिला, त्यामुळे भारत सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चा रद्द करील, अशी पाकिस्तानला अपेक्षा होती पण ती फोल ठरली भारताने चर्चा करण्याचा प्रस्ताव कायम ठेवला आहे.
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील विभाजनवादी नेत्यांनी असे म्हटले आहे, की पाकिस्तानच्या भारतातील दूतांनी आम्हाला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांच्याशी चर्चेचे निमंत्रण दिले आहे. अझीज व डोव्हल यांच्या चर्चेपूर्वी आमचे बोलणे होणार आहे. गिलानी यांच्या हुरियत परिषदेचे प्रवक्ते अयाज अकबर सांगितले, की पाकिस्तानने फोनवर हे निमंत्रण दिले आहे. आम्ही (गिलानी व इतर पक्षनेते ) यांनी सरताज अझीज यांना भारताशी चर्चेपूर्वी भेटावे, असे सांगून त्यांनी हे निमंत्रण दिले आहे.