जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा करणाऱ्या टीमचा भाग असणारे मेरठचे अजय कुमार चकमकीदरम्यान शहीद झाले. देशासाठी अजय कुमार यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. अजय कुमार यांच्या आईने आपल्याला आपल्या मुलाचा अभिमान आहे, देशासाठी त्याने आपले प्राण गमावले अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा खात्मा करण्याची मागणीदेखील केली.

अजय कुमार यांच्या आईने म्हटलं आहे की, ‘पाकिस्तानने इतक्या मुलांना मारलं आहे. पाकिस्तान इतकाही मोठा नाही की भारत त्याला नष्ट करु शकत नाही. भारत एका दिवसात पाकिस्तान नष्ट करु शकतो. मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. त्याने देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावली’.

दुसरीकडे अजय कुमार यांच्या पत्नीने कोणतीही नुकसान भरपाई आपल्या पतीला पुन्हा परत आणू शकत नाही असं म्हटलं आहे. ‘कोणतीही नुकसान भरपाई माझ्या पतीला परत आणू शकत नाही. माझ्या मुलांचे वडिल आणि एका आईचा मुलगा परत आणू शकत नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अजय कुमार शहीद झाल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.

अजय कुमार जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत होते. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अजय कुमार यांची बटालियन दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन करत होती. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अजय कुमार आणि त्यांचे तीन सहकारी शहीद झाले.

अजय कुमार 2011 मध्ये लष्करात भर्ती झाले होते. पती शहीद झाल्याची बातमी मिळाल्यापासून त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबत नाही आहेत. आपल्या पतीचं बलिदान वाया जाता कामा नये असं त्यांनी म्हटलं आहे.