पाकिस्तानला जूनपर्यंत करडय़ा यादीत (ग्रे लिस्ट) ठेवण्याचा निर्णय आर्थिक कारवाई कृती दलाने (एफएटीएफ) घेतला आहे. दहशतवादी कारवायांसाठी पैसै पुरविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पाकिस्तानने जी पावले उचलली आहेत त्यामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी असल्याचे निरीक्षण ‘एफएटीएफ’ने नोंदवले आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा समावेश काळ्या यादीत होण्याची शक्यता नाही, दहशतवादाविरोधातील प्रक्रियेत पाकिस्तानने लक्षणीय प्रगती केली आहे, असा दावा पाकिस्तानचे उद्योगमंत्री हम्माद अझहर यांनी शुक्रवारी केला. आव्हानात्मक परिस्थितीतही पाकिस्तानने लक्ष्य साध्य केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘एफएटीएफ’ची २७ कलमी कृती योजना पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या प्रयत्नांची जगाने स्तुती केल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानने ९० टक्क्य़ांपर्यंत उद्दिष्ट साध्य केले असल्याचे ‘एफएटीएफ’नेच म्हटले आहे. कृती योजनेतील उर्वरित त्रुटी दूर करण्यासाठी एफएटीएफने पाकिस्तानला आणखी चार महिन्यांचा कालावधी दिला आहे.