पाकिस्तानमध्ये पुरुषच असुरक्षित आहे, मग महिलांची काय अवस्था असेल याचा अंदाज येईल. मला कोणी विचारले मी एवढेच सांगीन, बाबांनो पाकिस्तानमध्ये जाऊ नका, पाकिस्तान हा सर्वात असुरक्षित देश असल्याचे उझमाने म्हटले आहे. पाकिस्तान म्हणजे मौत का कुआँ आहे, तिथून परतणे कठीण असल्याचे उझमा सांगते.

पाकिस्तानमधून भारतात परतल्यावर उझमाने गुरुवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि उझमाचे नातेवाईक उपस्थित होते. पत्रकार परिषदेत उझमाचे डोळे पाणावले होते. मी भारतात सुखरुप परतण्याचे श्रेय सुषमा स्वराज, माझे काका आणि माझ्या लहान मुलीला देईन असे उझमाने सांगितले. माझे आईवडील नाही, पण या सर्वांनी मला साथ दिली असे तिने नमूद केले.

मी पाकिस्तानमध्ये फिरायला गेले होते. १ मेला मी पाकमध्ये गेले. १० ते १२ मेपर्यंत भारतात परतण्याचा माझा विचार होता असे उझमाने स्पष्ट केले. पण तिथे गेल्यावर ताहिरने मला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मला बुनेर भागात नेले असे उझमाचे म्हणणे आहे. बुनेर हा भाग तालिबानी भाग वाटतो. तिथे प्रत्येकाच्या घरात शस्त्रास्त्र आहेत, प्रत्येकाच्या दोन ते तीन पत्नी आहेत असे उझमा सांगते. मी जर बुनेरमध्ये आणखी काही काळ थांबले असते तर त्यांनी मला विकले असते किंवा एखाद्या कारवाईत माझा वापर केला असता असे उझमाने सांगितले.

मी धाडस दाखवून ताहिरला पाकिस्तानमधील भारताच्या दुतावासापर्यंत आणले. दुतावासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला खूप मदत केली. सुषमा स्वराज या दररोज माझ्याशी संपर्कात होत्या. ‘तू देशाची मुलगी आहेस, तूला काही होऊ देणार नाही हे त्यांचे शब्द मला धीर देत होते. सुषमा स्वराज आणि त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांनी माझी खूप मदत केली, मी आयुष्यभर त्यांचे ऋणी राहीन’ असे उझमाने सांगितले. भारत हा सर्वोत्तम देश असून इथे प्रत्येक गोष्टीचे स्वातंत्र्य आहे असे तिने आवर्जून सांगितले. माझ्यासोबत जे झाले, ते दुसऱ्या मुलीसोबत होऊ नये यासाठी जनजागृती करणार असे तिने सांगितले.

उझमा नवी दिल्लीची रहिवासी असून ती या महिन्यातच पाकिस्तानला गेली होती. तिच्या म्हणण्यानुसार ताहिर अली नावाच्या व्यक्तीशी तिची मलेशियात भेट झाली होती. ताहिरने तिला पाकमध्ये बोलावले होते. तिथे गेल्यावर ताहिरने बंदुकीचा धाक दाखवून लग्न केल्याचे उझमाचे म्हणणे होते.