इस्लामाबाद येथील भारतीय दुतावासातील तीन अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा पाकिस्तानचा डाव फसला. संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा भारतात बोलावण्यात आले असून तिन्ही अधिकाऱ्यांनी पाकला कोणतीही माहिती पुरवली नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयने थेट भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले. यासाठी हनी ट्रॅपचा वापर करण्यात आला. दुतावासातील ट्रान्सलेशन विभागातील तीन अधिकारी आयएसआयच्या रडारवर होते. यातील एक अधिकारी हॉटेलमध्ये गेला असता तिथे एका महिलेने त्याच्याशी ओळख वाढवली. या महिलेने अधिकाऱ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे चित्रीकरणही केले होते. संबंधित अधिकाऱ्यांना आपण कशात फसलो हे वेळीच लक्षात आले आणि त्यांनी वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. दुतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केली आणि तातडीने त्या तिन्ही अधिकाऱ्यांना दिल्लीत पाठवण्यात आले. या तिघांची नियुक्ती पुन्हा पाकिस्तानमध्ये होणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तिन्ही अधिकारी चौकशीत सहकार्य करत असून त्यांनी कोणतीही गोपनीय माहिती दिली नव्हती, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

गोपनीय माहिती मिळवण्यासाठी जगभरातील गुप्तचर यंत्रणा हनी ट्रॅपचा वापर करतात. पैसे दिल्यास पुरावा राहतो आणि अधिकारी अडकू शकतात, त्यातुलनेत ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवणे सोपे असते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०१० मध्ये इस्लामाबादच्या भारतीय दुतावासातील प्रेस विभागातील अधिकारी माधूरी गुप्ता यांना भारतीय गुप्तचर यंत्रणांनी अटक केली होती. आयएसआयच्या एजंटला भारत- अफगाणिस्तान संबंधांविषयीची गोपनीय कागदपत्रे त्यांनी दिली होती. आयएसआयच्या एजंटने माधूरी यांच्याशी ओळख वाढवली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. यानंतर त्या एजंटने माधूरी यांच्याकडून माहिती मिळवली होती.