दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी पाकिस्तानची जागतिक स्तरावरुन कोंडी होत असताना खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत जैश – ए- मोहम्मदचे दहशतवादी भारतातील जिहादसाठी पैसे गोळा करताना दिसत आहेत.

मंगळवारी खैबर-पख्तूनख्वा या प्रांतातील एका मशिदीत ईदनिमित्त नमाज झाल्यानंतर जैश – ए- मोहम्मद आणि अल रहमत ट्रस्ट या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांचे दहशतवादी तिथे पोहोचले. भारत आणि अमेरिकेविरोधातील ‘जिहाद’साठी आर्थिक मदत करावी, असे सांगत या दहशतवाद्यांनी स्थानिकांकडून पैसे गोळा करायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे दहशतवादी पैसे गोळा करताना स्थानिक पोलीस तिथे उपस्थित होते, असे या व्हिडिओत दिसते. या व्हिडिओमुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले.

‘काफीर’ लोकांनी मुस्लिमांचे नुकसान केले असून आता त्यांच्या विरोधात जिहादसाठी पैसे द्यावे, असे हे दहशतवादी बोलताना दिसतात. दुसऱ्या व्हिडिओत हे दहशतवादी पैसे गोळा करण्यासोबतच जिहादमध्ये सामील व्हावे, असे देखील सांगत आहेत. खैबर-पख्तूनख्वा या प्रांतात २०१३ पासून नवनियुक्त पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘तेहरीक- ए- इन्साफ’ या पक्षाचे सरकार आहे.